‘जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते. डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा, तसेच मृत्यूचे कारण नमूद करणारा मृत्यू-दाखला देतात. हा मृत्यू-दाखला ‘जन्म-मृत्यू नोंदणी विभागा’कडे गेल्यावर मृत व्यक्तीच्या धर्मानुसार होणार्या अंत्यविधीसाठी ‘परवाना’ मिळतो.
१. बी.ए.एम्.एस्., बी.एच्.एम्.एस्. आणि एम्.बी.बी.एस्. डॉक्टर पुढील परिस्थितीत मृत्यू-दाखला देऊ शकतात !
१ अ. मृत्यू-दाखला देता येण्यासाठी डॉक्टरांनी कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक ? : ज्या डॉक्टरांची नोंदणी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ किंवा ‘स्टेट मेडिकल कौन्सिल’कडे झाली आहेे, ते सर्व आयुर्वेदिक (बी.ए.एम्.एस्), होमिओपॅथिक (बी.एच्.एम्.एस्.) अथवा अॅलोपॅथिक (एम्.बी.बी.एस्.) डॉक्टर मृत्यू-दाखला देऊ शकतात. मृत्यू-दाखला देतांना त्यांनी पुढील नियमांचे पालन केलेले असणे आवश्यक असते.
अ. त्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीवर नियमित उपचार केलेले असावेत किंवा व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीच्या १४ दिवसांत उपचार केलेले असावेत.
आ. व्यक्तीच्या मृत्यूच्या नमूद केलेल्या कारणाविषयी डॉक्टरांनी समाधानी असणे आवश्यक आहे.
२. बी.ए.एम्.एस्., बी.एच्.एम्.एस्. आणि एम्.बी.बी.एस्. डॉक्टर पुढील परिस्थितीत मृत्यू-दाखला देऊ शकत नाहीत !
अ. जेव्हा डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठाऊक नसेल, म्हणजेच मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिले नसेल अथवा तिच्यावर उपचार केले नसतील.
आ. व्यक्तीला मृत्यूपूर्वी डॉक्टरांकडे आणूनही त्यांनी तपासण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात आणले असेल.
इ. जर व्यक्तीचा अपघात होऊन किंवा आत्महत्या केल्याने मृत्यू झाला असेल, तसेच व्यक्तीची हत्या झाली असेल किंवा तिचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असेल.
ई. जर व्यक्तीचा, विशेषतः विवाहित स्त्रीचा भाजल्यामुळे मृत्यू झाला असेल.
उ. जर व्यक्तीचा मृत्यू पोलीस कोठडी, मानसिक रुग्ण असलेल्या बालकांचा आश्रम किंवा निराधारांसाठी असलेला आश्रम इत्यादींपैकी एके ठिकाणी झाला असेल.
३. मृत्यूच्या दाखल्याविषयी सर्वसाधारण सूचना
अ. डॉक्टरांनी मृत्यू-दाखला विनामूल्य देणे बंधनकारक आहे. एखादे डॉक्टर त्या कुटुंबाचे ‘फॅमिली डॉक्टर’च असले, तर ते त्या कुटुंबाचे पूर्वीच्या उपचारांचे देयक (बिल) मिळेपर्यंत ते मृत्यू-दाखला प्रलंबित ठेवू शकत नाहीत.
आ. मृत्यू-दाखल्याची केवळ एकच प्रत मिळते.
इ. डॉक्टरांनी मृत्यू-दाखला पूर्ण आणि योग्य रितीने भरणे आवश्यक असते.
ई. अनेकदा व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी डॉक्टर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून ‘मृत्यू-नोंदणी विभागा’कडे मृत्यू-दाखला पाठवतात. प्रत्यक्षात संबंधित विभागाकडे दाखला पाठवण्याचे दायित्व त्या संबंधित डॉक्टरांचे असते.
उ. ‘जन्म आणि मृत्यू-नोंदणी विभागा’त मृत्यू-दाखला दिल्यानंतर मृत्यू-प्रमाणपत्र प्राप्त होते.
– अश्विनी कुलकर्णी, आरोग्य साहाय्य समिती ॐ
तुम्हाला मृत्यू-दाखला मिळण्याच्या संदर्भात काही कटू अनुभव आले असल्यास त्याविषयी आम्हाला कळवा.
आपले अनुभव कळवण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]