Menu Close

पनवेल येथे ६ जानेवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

जात-पात, संप्रदाय, पक्ष बाजूला ठेवून एक ‘हिंदु’ म्हणून सभेला उपस्थित रहा ! : नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून सौ. अर्पिता पाठक, बोलतांना श्री. नरेंद्र सुर्वे, श्री. विनायक वाकडीकर

पनवेल : केवळ २ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेल शहरामध्ये १६ टोलेजंग चर्च कशासाठी ? इतकी भव्य चर्च उभारण्यासाठी आणि वर्षभर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य कुठून होते ? प्रिस्ट-नन्स् यांच्याद्वारे येथील रुग्णालयांमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली टाकण्यात येत असलेले धर्मांतराचे भावनिक जाळे,  शहरात गरीब, असाहाय्य हिंदूंचे आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र यांसह हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघांत याविषयी संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मिडल क्लास सोसायटीचे मैदान येथे ६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, लष्कर-ए-हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल हे त्यांच्या जाज्वल्य वाणीतून धर्मप्रेमींना संबोधित करणार आहेत. पनवेल पंचक्रोशीसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत या सभेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला असून समस्त हिंदुत्वनिष्ठांनी ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.

या सभेला समस्त हिंदूंनी जात-पात, संप्रदाय, पक्ष बाजूला ठेवून एक ‘हिंदु’ म्हणून सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. या सभेविषयी माहिती देण्यासाठी २ जानेवारीला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विनायक वाकडीकर आणि सनातन संस्थेच्या सौ. अर्पिता पाठक उपस्थित होत्या.

श्री. सुर्वे पुढे म्हणाले, ‘‘येथील आदई गावातील आदिवासी पाड्यांमध्ये ख्रिस्ती प्रचारकांकडून ‘गणपतीला लाथ मारा आणि ५०० रुपये मिळवा’, असे आवाहन करण्यात आले होते; मात्र तेथील हिंदूंनी संघटित होऊन त्यांना पिटाळून लावले. अशा प्रकारच्या धर्मांतराविषयी या सभेच्या माध्यमातून जागृती करण्यात येणार आहे.’’

आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान असलेल्या शिरढोण येथून सभास्थळी क्रांतीज्योत आणणार – !  विनायक वाकडीकर

आमच्या गावामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आमिष दाखवून ग्रामस्थांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावले. धर्मांतराच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान असलेल्या शिरढोण या पुण्यभूमीतून अधिकाधिक ग्रामस्थ या सभेला उपस्थित रहाणार आहेत. समस्त हिंदू बांधवांनीही अधिकाधिक संख्येने या सभेला उपस्थित रहावे.

सभेच्या माध्यमातून धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करण्यात येणार ! –  सौ. अर्पिता पाठक

आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. ‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीतून शिक्षण दिले जात आहे. हिंदूंची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकत आहेत. हिंदूंचे धर्मांतर हा त्याचाच परिणाम आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हाच यावर एकमात्र उपाय आहे. धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात त्वरित धर्मांतरबंदी कायदा आणणे आवश्यक आहे. या सभेच्या माध्यमातून ही मागणी करण्यात येणार असून त्यासाठीच आम्ही या सभेत सहभागी झालो आहोत.

पनवेल येथील सभेच्या प्रचारासाठी ४ जानेवारीला वाहनफेरी !

या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून जनजागृतीसाठी ४ जानेवारीला भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. ५ वाजता येथील ओरियन मॉलच्या येथून या फेरीला प्रारंभ होणार असून बसस्थानक-सावरकर चौक-टिळक रोड-टपालनाका-गांधी हॉस्पिटल या मार्गाने फेरी निघणार असून शिवाजी चौक येथे फेरीची सांगता होणार आहे. या फेरीमध्ये अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ९१६७७६६१३० या भ्रमणभाषवर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *