पेशवाईनंतर साधूंचा कुंभमेळ्यातील छावणीमध्ये प्रवेश
प्रयागराज (कुंभनगरी) : १५ जानेवारीपासून प्रारंभ होणार्या येथील कुंभमेळ्यासाठी १५ ते २० दिवस आधीपासून विविध आखाड्यांच्या पेशवाईमुळे (मिरवणुकांमुळे) भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. एकूण १३ आखाड्यांपैकी ‘श्री पंच दशनाम जुना आखाडा’, ‘श्री पंच दशनाम आवाहन आखाडा’, ‘श्री पंच अग्नि आखाडा’, ‘श्री पंचायती आखाडा निरंजनी’, ‘श्री शंभु पंच अटल आखाडा’ आणि ‘श्री तपोनिधी आनंद आखाडा’ या ६ आखाड्यांच्या भव्य-दिव्य पेशवाई आतापर्यंत झालेल्या आहेत.
या पेशवाईंमध्ये हत्ती, घोडे, उंट, रथ, ट्रॅक्टर, ट्रक आदींना फुलांच्या माळांनी सजवून त्यावर हातात भगवे ध्वज आणि शस्त्र घेतलेले साधू-संत विराजमान झाले. शंख, मृदुंग, तुतारी, ढोल-ताशे या पारंपरिक वाद्यांसह शहरातून बँड-बाज्यासह वाजत-गाजत मिरवणुका काढल्या गेल्या. या वेळी साधूंच्या हातात तलवार, भाले, त्रिशुळ, गदा आदी पारंपरिक शस्त्रे होती. साधूंकडून रस्त्यांवर या पारंपरिक शस्त्रांची विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके लोकांना दाखवली गेली. रस्त्याच्या दुतर्फा हात जोडून उभे असलेले भाविक साधू-संतांचे आशीर्वाद घेत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून संतांवर पुष्पवृष्टी केली गेली.
पेशवाईतील साधू-संतांचा क्रम !
प्रारंभी हत्ती-घोड्यांवर शस्त्रे घेऊन स्वार झालेले साधू, नंतर त्या आखाड्याची आराध्यदेवता, उदा. भगवान श्री दत्तात्रेय, श्री कार्तिकेय, श्री गणेश आदी देवतांची पालखी, नंतर ५०-६० फूट उंचीचा आखाड्यांचा भव्य ध्वज, आखाड्याचे प्रमुख आचार्य-महंत, नंतर पीठाधिश्वर, १०० हून अधिक महामंडलेश्वर, साधू-संत आणि सर्वांगावर भस्म लावलेल्या अन् फुलांच्या माळा घातलेल्या नागा साधूंचा एक भला मोठा समूह हत्ती, घोडे, उंट यांवर स्वार झालेला असतो. त्यांच्यामागे विविध संघटना, संप्रदाय, भक्त आणि सामान्य लोक सहभागी झालेले असतात. यात विदेशी नागरिक, भक्त आणि संत हेही सहभागी झालेले असतात. पेशवाई निघण्यापूर्वी आराध्यदेवता आणि आखाड्यांच्या परंपरेतील संत यांची पूजा केली जाते. पेशवाई शहरातून प्रारंभ होऊन शेवटी कुंभमेळ्याच्या ठिकाणी असलेल्या त्या त्या आखाड्यांच्या छावण्यांमध्ये येऊन थांबते. नंतर कुंभमेळा संपल्यावरच ते पुन्हा मूळ स्थानी प्रस्थान करतात. ही पेशवाई मिरवणूक सुमारे ४ – ५ घंटे किंवा त्याहून अधिक काळ चालते.
श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी विश्वात्मानंद महाराज यांनी पेशवाईविषयी सांगितले, ‘‘ज्या वेळी आखाड्यांची स्थापना झाली तेव्हापासून या पेशवाई मिरवणुका निघत आहेत. या आखाड्याची स्थापना ख्रिस्ताब्द ८०६ मध्ये झाली; मात्र मध्यंतरी अन्य पंथीयांच्या प्रभावामुळे (पेशवाई) जवळजवळ १५० वर्षे बंद होती.’’
पेशवाईचे वैशिष्ट्य असलेले भैरव प्रकाश आणि सूर्य प्रकाश नावाचे भाले !
या आखाड्यांची भव्य परंपरा आहे. त्यांच्यातील त्याग, सर्मपण आणि तपस्या यांमुळे वेळोवेळी धर्म आणि देश यांचे रक्षण झाले आहे. या प्रत्येक आखाड्यांना स्वतःच्या प्रथा, परंपरा, नियम असतात. अस्त्र-शस्त्र हे आखाड्यांचे वैभव आहे. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीकडे भैरव प्रकाश आणि सूर्य प्रकाश नावाचे दिव्य भाले आहेत. त्यांची नियमित पूजाअर्चा केली जाते. हे सर्वसाधारण भाले नसून वीरता, वैभव, त्याग आणि परंपरा यांचे प्रतीक आहेत. भैरव प्रकाश हा रात्रीचा, तर सूर्य प्रकाश हा दिवसाचे प्रतीक आहे.
आखाड्यांची स्थापना झाली तेव्हापासून हे भाले आहेत. या भाल्यांद्वारे अनेक धर्मयुद्ध लढली गेली आहेत. आखाड्याच्या नागा साधूंनी अनेकदा मोगलांना धूळ चारली आहे. देशात इंग्रजांचे शासन आल्यावर त्यांच्याशी आवश्यकतेनुसार युद्धे झालेली आहेत. या दोन्ही भाल्यांवर ५२-५२ प्रकारचे लोखंडी छल्ले (अंगठीसारखा प्रकार) लावलेले असतात. त्यांना ५२ भैरवांचे प्रतीक मानले जाते. हे भाले विजयादशमीच्या नंतर केवळ कुंभपर्व काळात बाहेर काढले जातात. त्याची पूजा करून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात