Menu Close

रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारे डॉक्टर !

१. १२ दिवसांच्या मुलाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याला अतीदक्षता विभागात अधिक काळ ठेवून पैसे उकळणारे डॉक्टर !

१ अ. १२ दिवसांच्या मुलाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतीदक्षता विभागात भरती करावे लागणे, तेथील शुल्क प्रतिदिन ३५,००० रुपये असणे आणि ३ दिवसांनंतर ‘आणखी दोन दिवस तेथेच ठेवावे लागेल’, असे डॉक्टरांनी सांगणे : ‘दोन वर्षांपूर्वी माझा मुलगा चि. प्रल्हाद १२ दिवसांचा असतांना त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची स्थिती इतकी बिकट झाली की, त्याला तात्काळ रुग्णालयात भरती करावे लागले आणि तज्ञांच्या निरीक्षणाखाली लहान मुलांसाठी असलेल्या अतीदक्षता विभागात (Intensive Child Care Unit मध्ये) त्याला ठेवावे लागले. तो त्याच्या जीवन-मरणाचाच प्रसंग होता. संपूर्ण एक दिवस निरीक्षण केल्यावर तेथील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, ‘‘प्रल्हादला अतीदक्षता विभागात ठेवावे लागेल आणि त्याच्या प्रकृतीत जसजशी सुधारणा होईल, त्याप्रमाणे तुम्हाला कळवले जाईल.’’ तेथील शुल्क प्रतिदिन ३५,००० रुपये होते. ३ दिवस अतीदक्षता विभागात ठेवल्यानंतर ‘आणखी दोन दिवस तेथेच ठेवावे लागेल’, असे डॉक्टरांनी सांगितले.

१ आ. देवाच्या कृपेने एक चांगले डॉक्टर भेटणे, त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्याचा, तसेच प्रल्हादला अतीदक्षता विभागातून ‘वॉर्ड’मध्ये हालवण्याचा सल्ला देऊन ‘वॉर्ड’मध्ये आम्ही बाळावर नीट उपचार करू’, असे सांगून आश्‍वस्त करणे : देवाच्या कृपेने आम्हाला एक चांगले डॉक्टर भेटले आणि त्यांनी सांगितले, ‘‘आता खरेतर प्रल्हादला अतीदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला माझ्या वरिष्ठ डॉक्टरांकडे घेऊन जातो. तुम्ही त्यांना प्रल्हादला ‘वॉर्ड’मध्ये हालवण्यास सांगा आणि ‘त्याला काही झाले, तर त्याचे दायित्व आम्ही घेतो’, असेही सांगा. वरिष्ठ डॉक्टर तुम्हाला सांगतील, ‘बाळ लहान असल्याने आम्ही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे त्याला अतीदक्षता विभागात ठेवणेच योग्य आहे, तरीही तुम्ही ठामपणे बाळाला ‘वॉर्ड’मध्ये हालवण्यास सांगा. ते डॉक्टर व्यावसायिक वृत्तीचे असल्याने पैसे कमावण्यासाठी तुम्हाला असे सांगतील; पण तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या बाळावर नीट उपचार करू.’’ नंतर त्यांनी बाळाला वॉर्डमध्ये हालवले. तेथे प्रतिदिन १०,००० रुपये शुल्क होते. तेथे २ दिवस ठेवल्यानंतर बाळाला घेऊन आम्ही घरी आलो.

या अनुभवावरून ‘पैसे कमावण्यासाठी डॉक्टर खोटी माहिती देऊन कशी दिशाभूल करतात ?’, हे आमच्या ध्यानी आले.’

२. रुग्णाची प्रकृती गंभीर असतांना त्याला रुग्णालयात भरतीही करून न घेणारे आणि मृत्यूच्या खाईत लोटणारे माणुसकीशून्य डॉक्टर !

२ अ. गंभीर स्थितीतील रुग्णाला उपचारांची अत्यावश्यकता असतांना रुग्णालयाने भरतीही करून न घेणे : ४ वर्षांपूर्वी एका साधकाच्या वडिलांना रुग्णालयात तात्काळ भरती करण्याची आवश्यकता होती. त्यांना उपचारांसाठी त्यांच्या गावापासून ८० कि.मी. अंतरावर असलेल्या एका शहरातील रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असतांना आणि त्यांना तात्काळ उपचारांची आवश्यकता असतांनाही दोन रुग्णालयांनी त्यांना भरतीही करून घेतले नाही.

२ आ. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होणे : नंतर त्यांना तिसर्‍या रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले; पण तोपर्यंत पुष्कळ उशीर झाला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने ४ – ५ घंट्यांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही सुमारे १ घंटा त्यांना अतीदक्षता विभागात ठेवले आणि देयकांत ते अतिरिक्त शुल्कही दाखवले. रुग्णालयाने हे जाणूनबुजून केले असल्याचे ध्यानात आल्यावर आम्ही त्याला विरोध केला; पण रुग्णालयाने त्याची दखल न घेता ठरल्याप्रमाणे सर्व देयक आकारले.

वरील दोन्ही प्रसंगांतून डॉक्टर आणि रुग्णालये यांचा ‘रुग्णांच्या प्रकृतीकडे पहाण्याचा उद्देश कसा आहे ? ते रुग्णांच्या कुटुंबियांच्या भावनांशी कसे खेळतात ? आणि रुग्णांच्या मृत्यूनंतरही ते त्यांच्या कुटुंबियांना कसे लुबाडतात ?’, हे ध्यानात आले.’

– श्री. चेतन गाडी, आंध्रप्रदेश (१३.१२.२०१८)

३. नागरिकांनी त्यांचे अधिकार जाणून घेणे आवश्यक !

‘वरील घटनांच्या संदर्भात नागरिकांनी त्यांचे अधिकार जाणून घेणे आवश्यक असून विविध खटल्यांत न्यायालयांनी दिलेले निर्णय, ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ची आचार संहिता आणि भारतीय संविधान यांनुसार शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांची विहित कर्तव्ये पुढे देत आहोत.

३ अ. शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांची विहित कर्तव्ये

१. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी प्रत्येक रुग्णाला तात्काळ वैद्यकीय उपचार करणे आणि दुखापतग्रस्त रुग्णाला तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवणे, हे त्यांचे सेवेतील प्रथम कर्तव्य आहे.

२. ही तात्काळ वैद्यकीय सेवा कोणत्याही प्रकारे पैशाची अथवा आगाऊ रकमेची (‘अ‍ॅडव्हान्स’ची) मागणी न करता द्यायची आहे.

३. सेवेची गुणवत्ता अन् सुरक्षितता यांमध्ये तडजोड न करता रुग्णालय व्यवस्थापनाने तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.’

– अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य साहाय्य समिती (२१.१२.२०१८)

वैद्यकीय क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आपल्यालाही आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास त्या आम्हाला डॉक्टर आणि रुग्णालय यांच्या नावांसह कळवा.

चांगले डॉक्टर आणि परिचारिका यांना नम्र विनंती

पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना आहे. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल.’

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *