राममंदिराचा संकल्प करण्यासाठी प्रभु श्रीरामालाच साकडे
मुंबई : राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे, अशी माहिती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ‘हिंदूंनी राममंदिर उभारण्यासाठी आता श्रीरामाचीच कृपा संपादन करणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे,
१. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य असतांना, तसेच न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे ते पुन्हा सिद्ध झाले असतांनाही गेल्या ८ वर्षांपासून राममंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
२. हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? जगभरातील मुसलमान मक्का-मदिना येथे, तर ख्रिस्ती जेरूसलेम येथे जातात; मात्र जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली रामजन्मभूमी येथे साधी पूजा करण्यासही हिंदूंना वाव नाही.
३. गेली कित्येक वर्षे प्रभु श्रीराम येथे एका कापडी तंबूत आहेत, ही एकप्रकारे श्रीरामांची विटंबनाच आहे. हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राममंदिरासाठी काहीही केले नाही. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली न्यायव्यवस्था ‘राममंदिराचा खटला आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. अशा परिस्थितीत हिंदूंसाठी प्रभु श्रीराम हेच एकमेव आधारस्तंभ आहेत. यासाठी आता आम्ही श्रीरामालाच साकडे घालणार आहोत.
४. देशभरातील हिंदु भाविकांना आम्ही आवाहन करतो की, राममंदिर उभारण्याचा संकल्प करा आणि प्रभु श्रीरामाला ‘राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर करावेत, सरकारमधील मंत्र्यांना राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे आणि न्यायालयातील संबंधित न्यायाधिशांना या प्रकरणी शीघ्रतेने निर्णय घेता यावेत’, अशी प्रार्थना करावी.
हिंदूंना आवाहन
‘हिंदूंनी त्यांच्या परिसरातील राममंदिरात एकत्र येऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप सामूहिकपणे करावा. शक्य असेल, तर एकत्रित येऊन मंदिरांमध्ये श्रीरामाची आरती करावी’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.