Menu Close

तांदुर (तेलंगण) येथे प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

व्यासपिठावर डावीकडून श्रीलता रेड्डी, भरत कुमार शर्मा, चेतन जनार्दन आणि बोलतांना श्री. रमेश शिंदे

भाग्यनगर : हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तांदुर शहरातील आर्य वैश्य समाजाच्या सभागृहात ६ जानेवारी या दिवशी प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘हिंदु टी.व्ही.’ या वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भरत कुमार शर्मा, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजक श्रीमती श्रीलता रेड्डी आणि हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण-आंध्र प्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन हे मान्यवर उपस्थित होते. या सभेला तांदुर शहराच्या नगराध्यक्षा श्रीमती सुनिता संपत या पूर्णवेळ उपस्थित होत्या.

आरंभी सनातन पंचांगाच्या तेलुगु भाषेतील ‘ऑनलाईन’ आवृत्तीचे लोकार्पण श्री. भारत कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक श्री. चेतन जनार्दन यांनी, तर सूत्रसंचालन श्री. जगन रेड्डी यांनी केले. सभेच्या शेवटी श्री. चेतन जनार्दन यांनी उपस्थित धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली.

सभेतील वक्त्यांची ओजस्वी भाषणे

भविष्यात ‘रझाकारी’ अत्याचारांना बळी पडायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले,

१.वर्ष १९४७ मध्ये भारताची धर्माच्या आधारे फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. या वेळी हैदराबाद संस्थानाच्या निजामाने भारतात विलीन होण्याची विनंती नाकारली.

२. स्थानिक बहुसंख्य जनता हिंदू असतांनाही त्याला पाकिस्तानात सामील व्हायचे होते. त्यासाठी त्याने स्वतःच्या सैन्याच्या व्यतिरिक्त ‘एम्आयएम्’च्या कासिम रिझवीला अत्याचारी मुसलमानांची ‘रझाकार’ सेना बनवण्यास सांगितले.

३. या रझाकारांनी हिंदूंच्या घरात घुसून लुटमार, महिलांवर बलात्कार, पुरुषांच्या हत्या करण्याचे सत्र आरंभले.

४. त्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थानिक हिंदू, तसेच आर्य समाज, हिंदु महासभा यांच्या साहाय्याने भारताच्या सशस्त्र दलांच्या द्वारे ‘ऑपरेशन पोलो’ राबवून निजामाच्या सैन्याला १८ सप्टेंबर १९४८ या दिवशी शरण येण्यास भाग पाडले.

५. त्या काळात जर स्थानिक हिंदूंनी बलीदान दिले नसते, तर आज आपल्याला आणखी एक पाकिस्तान दिसला असता आणि येथील हिंदूंवरील अत्याचार पहात बसावे लागले असते.

६. आज पुन्हा येथील मुसलमान लोकसंख्या वाढत आहे, ‘एम्आयएम्’ ताकदवान होत असून भविष्यात ‘रझाकारी’ अत्याचारांना बळी पडायचे नसेल, तर हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्राची’ मागणी करावीच लागेल.’’

ब्रिटिशांनी जे प्रकार केले नाहीत, ते आज डाव्यांचे सरकार करत आहे ! – भारत कुमार शर्मा

श्री. शर्मा म्हणाले, ‘‘आज शबरीमलाच्या ठिकाणी ‘कम्युनिस्ट’ सरकारकडून चालू असलेले प्रकार हे हिंदू धर्मविरोधी षड्यंत्र आहे. भारत गुलाम असतांनाही ब्रिटिशांनी जे प्रकार केले नाहीत, ते आज डाव्यांचे सरकार करत आहे. हिंदु समाजात महिलांना कनिष्ठ स्थान नसून, त्यांना तर देवता म्हणून संबोधले आहे. हिंदु समाज आज अनेक स्त्री देवतांची मोठ्या भक्तीभावाने आराधना करत आहे. त्यामुळे या सर्व धर्मविरोधकांना तोंड देण्यासाठी धर्माचे आचरण करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे.’’

हिंदु समाज संघटितपणे रस्त्यावर उतरला, तर विरोधकांना पळता भुई थोडी होईल  ! – श्रीलता रेड्डी

श्रीलता रेड्डी म्हणाल्या, ‘‘हिंदु समाज आज संकटात आहे. देवता, धर्म, मंदिरे, स्त्रिया यांच्यावर विविध प्रकारे आघात केले जात आहेत. लव्ह जिहादद्वारे आमच्या भगिनींना धर्मांतरित केले जात आहे. आज जर हिंदू संघटित झाले नाहीत, तर भविष्यात त्यांना ‘हिंदु’ म्हणून जगणे कठीण आहे. हिंदु समाज सहिष्णु असला, तरी त्याला नपुंसक समजण्याची चूक करू नये. उद्या हा समाज संघटितपणे रस्त्यावर उतरला, तर विरोधकांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे विनाकारण या समाजाला आव्हाने देऊ नका.’’

भारतापासून विभाजन झालेल्या इस्लामी राष्ट्रांतील हिंदू संकटातच ! – चेतन जनार्दन

श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘प्राचीन काळातील अखंड भारताचे विभाजन होऊन आज कंबोडिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश अशी निरनिराळी राष्ट्रे बनली. यांतील अनेक राष्ट्रांत हिंदु समाजच संकटात सापडलेला आहे. हिंदु समाजाची लोकसंख्या आजही अल्प होत असून असेच चालू राहिल्यास देशाचे विभाजन होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हिंदु समाजाने सर्व समस्यांवरील उपाय असणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हायला हवे.’’

हिंदु विद्यार्थ्यांचे जन्मदाते वडील जिवंत असतांना त्यांना कॉन्व्हेंट शाळेत ख्रिस्ती धर्मप्रचारकाला ‘फादर’ म्हणायला लावतात !

श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘आज पाश्‍चात्त्य प्रभावाच्या नावाखाली हिंदूच स्वतःच्या मुलांना ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळेत पाठवत आहेत. तेथे त्यांचे ख्रिस्तीकरण चालू आहे. याचे उदाहरण म्हणजे या शाळांतील मुलांना तेथील चर्चच्या प्रमुखाला ‘फादर’ म्हणण्यास शिकवले जाते. ज्या हिंदु मुलाचे जन्मदाते वडील जिवंत आहेत, त्याने अन्य पंथीय धर्मप्रचारकाला ‘फादर’ का म्हणावे ? या गोष्टी हिंदूंना का अयोग्य वाटत नाहीत ? अशा अनेक कारणांसाठी हिंदु धर्माचे शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आपण धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले, तर धर्म आपले रक्षण करील. यास्तव हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने प्रतिसप्ताह धर्मशिक्षण घेण्यासाठी १ घंटा तरी दिला पाहिजे.’’ श्री. शिंदे यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी प्रतिसाद देऊन प्रतिसप्ताह एकत्र येण्याची सिद्धता दर्शवली.

क्षणचित्रे

१. या सभेचे संपूर्ण आयोजन आणि प्रसार समितीच्या वतीने गोवा प्रतिवर्षी होणार्‍या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या धर्माभिमानी हिंदूंनी केले होते. त्यांनी स्वतःच्या व्यवसायातून वेळ काढून विविध गटांना भेटून सभेचे महत्त्व सांगून त्यांना येण्यास प्रोत्साहित केले. यात प्रामुख्याने श्री. संतोष आष्टीकर, श्री. प्रवीण, श्री. मोहन कुमार आणि श्री. रजनीकांत यांचा समावेश होता.

२. या सभेला सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते पक्षभेद विसरून ‘हिंदु’ म्हणून एकत्र आले होते.

३. सभेला विविध धार्मिक संघटना आणि संप्रदाय यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

४. सभेचा प्रसार करणारे धर्मप्रेमी श्री. रजनीकांत यांना सभा चालू होण्यापूर्वी त्यांच्या आजीचा मृत्यू झाल्याचा संदेश आला; मात्र ते सभा पूर्ण होईपर्यंत सेवा करत होते. त्यानंतरच ते आपल्या गावी परत गेले.

५. सभेच्या ठिकाणी लावलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद लाभला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *