Menu Close

कुंभमेळ्यात अडीच सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थांना प्रशासनाने जागा नाकारली !

सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हिंदु जनजागृती समितीला जागा नाकारली !

‘कुंभमेळ्या’ची प्रातिनिधिक छायाचित्रे

प्रयागराज : येथील भव्य कुंभमेळ्यात कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध व्हावी, तसेच अन्य सुविधा मिळाव्यात, यासाठी ८ सहस्रांहून अधिक धार्मिक संस्थांनी उत्तरप्रदेशातील कुंभमेळा प्रशासनाकडे अर्ज केले होते; मात्र नव्याने अर्ज करणार्‍या अडीच सहस्रांहून अधिक धार्मिक संस्थांना कुंभमेळा प्रशासनाने जागा उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज नाकारल्याचे लेखी पत्र पाठवून कळवले आहे. प्रत्यक्षात यांतील अनेक धार्मिक संस्था अनेक वर्षांपासून समाजात कार्यरत आहेत. तसेच या कुंभमेळ्यात मागील कुंभमेळ्यापेक्षा अधिक भूमी अधिग्रहित केलेली आहे. प्रत्यक्षात ७ जानेवारीपर्यंत अनेक ठिकाणी कुंभमेळा प्रशासनाने वाटप केलेल्या जागेत कोणतेही बांधकाम न झाल्याने या जागा रिकामी पडून असल्याचे दिसून येत आहे.

हिंदु जनजागृती समितीलाही जागा नाकारली !

हिंदु जनजागृती समिती गेल्या १६ वर्षांपासून राष्ट्र-धर्म रक्षण अन् जागृतीचे कार्य करत आहे. प्रयाग, नाशिक आणि उज्जैन येथे या पूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातही समितीने राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य केले आहे.

त्या वेळी सर्व संत- महंत यांनीही समितीच्या कार्याचे कौतुक केले होते. प्रयागराज कुंभमेळ्यातही समितीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करण्याचे नियोजन केले होते. कुंभनगरीत जागा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण केली होती. तरीही प्रशासनाने समितीला जागा उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र पाठवून कळवले आहे.

कुंभमेळा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे साधू-संतांनाही अडचण !

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही जणांनी आधीच मोठ्या प्रमाणावर वशीले लावून मोक्याच्या अनेक जागा मोठ्या प्रमाणावर हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे इतरांना जागा मिळण्यास अडचणी येत आहेत. काहींनी अधिक जागा घेऊन अन्य संस्थांकडून काही रक्कम घेऊन ती जागा त्यांना वापरण्यासाठी दिली आहे. कुंभमेळा प्रशासनाच्या या गलथान कारभाराला वैतागून काही साधू-महंतांनी स्वतःच काही ठिकाणी रिकाम्या जागेवर स्वतःचे तंबू उभारले. एका ठिकाणी ते हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन आले असतांना सर्व साधूंनी मिळून आंदोलन करून कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी दिली. त्यावर पोलीस प्रशासन चूपचाप निघून गेले.

सरकारकडून स्वतःच्या मर्जीतील संस्थांना झुकते माप !

धार्मिक संस्था, संत आणि साधू यांना जागा न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर अप्रसन्नता (नाराजी) व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश शासन स्वतःच्या मर्जीतील लोकांना झुकते माप देत पक्षपात करत असल्याचा गंभीर आरोपही अनेक साधू-संतांनी केला आहे. प्रत्यक्षातही सरकारच्या मर्जीतील अनेक संस्था, संघटनांना मोक्याच्या ठिकाणी सोयी-सुविधा देऊन प्रशस्त जागा वाटलेल्या आहेत. अन्य संस्थांना प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी प्रशासनाशी झगडावे लागत आहे. यामुळे सरकारविषयी कुंभमेळ्यात अप्रसन्नता वाढली आहे. भूमी वाटपाच्या सूत्रावर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. केशव प्रसाद मौर्य यांना प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी साधू संतांना निश्‍चितपणे भूमी देण्याचे आश्‍वासन दिले; मात्र ‘त्याची पूर्तता कधी होणार आणि धार्मिक संस्था कुंभमेळ्याच्या पूर्वी सर्व सिद्धता कशा करणार ?’, हा प्रश्‍नच आहे. केवळ वेळ मारून नेण्यासाठी आश्‍वासने देण्यात येत आहेत, असे दिसून येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *