धर्मनिरपेक्षतेची बांगा पुरे झाल्या, आता हिंदु राष्ट्राचा जयघोषच होणार ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
सावर्डे : बहुसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक मताला कवडीमोल ठरवत इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करून हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचे घोषित केले. याच धर्मनिरपेक्ष भारतात आज हिंदूंना आपल्या धार्मिक अस्तित्वासाठी झगडावे लागणार असेल, तर निधर्मीवाद्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या बांगा आता पुरे झाल्या. या देशात आता हिंदु राष्ट्राचाच जयघोष होणार, असे ठोस प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी केले.
वहाळ (सावर्डे), ता. चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला वहाळ, आबीटगाव, शिरशिंगे येथील धर्मप्रेमी उपस्थित होते. कु. महेश लाड यांनी या सभेचे सूत्रसंचलन केले.
या वेळी डॉ. चाळके यांनी धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दु:स्थिती आणि त्यामुळे हिंदु धर्म अन् हिंदु धर्मीय यांच्यावर होणारे विविध आघात यांविषयी विविध घटनाक्रम सांगून उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आवश्यकतेचे महत्त्व पटवून दिले.
या सभेकरता न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वहाळचे निवृत्त मुख्याध्यापक श्री सदानंद काटदरे, विद्यमान मुख्याध्यापक श्री. जाधव यांनी बहुमोल सहकार्य केले. या वेळी ह.भ.प. काकामहाराज भुवड, रा.स्व. संघाचे श्री. विनायक पाध्ये, शिवसेनेचे जयराम पवार, प.पू. तुकाराम महाराज वनगे यांचे उत्तराधिकारी श्री. संतोष महाराज वनगे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील गांधी, श्री. कदम, श्री. सुरेश लाड, अन् सनातन संस्थेचे श्री. शिवराम बांद्रे उपस्थित होते.
विशेष
१. सभेत धर्मशिक्षण आणि मकरसंक्रांतीविषयी सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगितल्यावर उपस्थित वहाळ येथील महिलावर्गाने त्यांच्या हळदी-कुंकू समारंभासाठी सनातनच्या ४०० सात्त्विक कुंकू डब्यांची मागणी केली आणि मकरसंक्राती विषयावर प्रवचन घेण्याची विनंती केली.
२. न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वहाळच्या शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सभेच्या सिद्धतेसाठी सहकार्य केले.
३. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्थाही विद्यालयाने केली.
४. सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.