वाराणसी : भगवान श्रीराम कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्यानगरी प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हिंदूबहुल भारतात रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे दुर्दैवी आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, तसेच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत तात्काळ कायदा करण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? सरकारने गेल्या साडेचार वर्षांत हे का केले नाही ? – संपादक)
पंतप्रधानांना पाठवण्यासाठी याविषयीचे निवेदन वाराणसी जिल्हाधिकार्यांकडे सुपुर्द करण्यात आले. या वेळी ‘इंडिया विथ विजडम ग्रुप’चे अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, नागरिक उत्थान सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, अधिवक्ता अनुपकुमार सेठ, नागरिक उत्थान सेवा समितीचे कोषाध्यक्ष तथा विश्व सनातन सेनेचे श्री. अनिलसिंह सोनू, श्री. प्रदीप श्रीवास्तव, अधिवक्ता संजीवन यादव, श्री. अरुणकुमार मौर्य, श्री. विनोद पटेल, श्री. चंदन त्रिपाठी, श्री. विशाल मौर्य, श्री. स्वतंत्रकुमार सिंह, श्री. विकास वर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर सेठ उपस्थित होते.