कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ थांबवा आणि राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा ! – हिंदु जनजागृती समिती
खेड : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विविध पौराणिक स्थळे याची साक्षीदार आहेत. असे असतांना हा वाद न्यायालयात जाणे अपेक्षित नव्हते. आज हिंदूंना त्यांचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाचे मंदिर होते का ? हे हिंदुस्थानातच सिद्ध करावे लागत आहे, हे कोट्यवधी हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ करणे थांबवा, राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा, अशी जोरदार मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.
१० जानेवारीला येथील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राममंदिर उभारण्यासह, सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर येथील प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे सूत्रसंचालन डॉ. हेमंत चाळके यांनी केले. येथील ‘दीप केबल’ने या आंदोलनाचे चित्रीकरण केले.
उपस्थित संत आणि मान्यवर
या आंदोलनाला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
उधळे येथील ह.भ.प. चंद्रकांत पंडव; तळे येथील ह.भ.प. रघुनाथ सापिलदे; संस्कार भारती खेडचे अध्यक्ष विनय माळी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय कृष्णा तांबडे; प्रशांत प्रकाश वैद्य; नितीन विठोबा दिवटे; योग्य वेदांत समितीचे आकेश कुराडे; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे नगरसेवक भूषण चिखले; युवा सेना उपशहर अधिकारी राजेश मोरे; शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन खेडेकर; चिंचघर येथील श्री भैरवनाथ देवस्थानाचे हरिश्चंद्र जाधव; त्रिमूर्ती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खेडेकर; गणेश भोसले, खेमनाथ मित्रमंडळ, सुसेरी क्र. २ चे वसंत पवार; हिंदुराज मित्र मंडळाचे संजय शिंदे; शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे प्रशांत सावंत; हिंदु जनजागृती समितीचे विलास भुवड; संतोष घोरपडे; परेश गुजराथी आणि सनातन संस्थेचे केशव अष्टेकर आदी ५० जण उपस्थित होते.
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्रीरामाचा गजर
खेड वारकरी सांप्रदायिक व भाविक मंडळाचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी टाळ आणि मृदुंग यांसह सर्व उपस्थित धर्मप्रेमींच्या साथीने श्रीरामाचा गजर केला, तेव्हा वातावरण भक्तीमय झाले.