कुंभमेळा प्रयागराज २०१९ : प्रशासनाविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त
- कुठे हिंदूंच्या प्राचीन धार्मिक प्रथा-परंपरा जपणारे पूर्वीचे तेजस्वी राजे, तर कुठे साधू-संतांना मूलभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित ठेवणारे हल्लीचे शासनकर्ते !
- पूर्वी धर्मसत्तेचा राजसत्तेवर अंकुश होता. त्यामुळे राजाला संतांविषयी आदर होता. आता ‘निधर्मी’ राज्यात याच्या उलट परिस्थिती असल्याने साधू-संतांचा पदोपदी अवमान होत आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
- साधू-संतांशी असे वागणारे सरकार सर्वसामान्य हिंदूंशी कसे वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा !
प्रयागराज : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ‘कुंभक्षेत्री शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात आल्या आहेत’, असे सांगत आहेत. तथापि येथे साधू-संतांना मोठ्या प्रमाणात असुविधांचा सामना करावा लागत आहे. येथे ९ जानेवारीला झालेल्या ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’च्या बैठकीत संत आणि महंत यांनी कुंभक्षेत्री असलेल्या असुविधांविषयी तीव्र अप्रसन्नता (नाराजी) व्यक्त केली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज होते. तसेच श्रीमहंत सत्यगिरी महाराज यांनी मकरसंक्रातीच्या दिवशी पहिले राजयोगी स्नान पूर्वीप्रमाणे संगम तिरावर करण्याचे सूत्र उपस्थित केल्यावर अन्य संतांनी त्याला अनुमोदन दिले. कुंभमेळा क्षेत्रात असलेल्या श्रीपंचायती आखाड्याच्या बडा उदासीन निर्वाणच्या शिबिरात झालेल्या आखाडा परिषदेच्या बैठकीत श्रीमहंत महेश्वरदास, श्रीमहंत प्रेमगिरी, महंत रघुमुनी, महंत रवींद्र पुरी, महंत जमुना पुरी आदी महंत उपस्थित होते.
शौचालयांची दूरवस्था : नगरविकासमंत्र्यांकडे तक्रार !
या बैठकीत सर्वाधिक अप्रसन्नता ही कुंभक्षेत्री उपलब्ध करून देण्यात आलेल्या शौचालयांविषयी व्यक्त करण्यात आली. आखाडे आणि संत वास्तव्य करतात, तो परिसर यांठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयांमुळे दुर्गंधी पसरली आहे. श्रीमहंत व्यास मुनी महाराज, श्रीमहंत राजेंद्रदास महाराज यांनी बैठकीत शौचालयाच्या दूरवस्थेविषयी माहिती दिली. या शौचालयांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी संतांनी केली आहे. (कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने ४ सहस्र ३०० कोटी रुपये संमत करूनही कुंभक्षेत्री शौचालयांची योग्य पद्धतीने व्यवस्थाही करू न शकणारे लोकप्रतिनिधी जनकारभार कसा हाकत असतील, याची कल्पना येते ! मूलभूत सुविधेसाठी संत-महंत यांना मागणी करावी लागणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
याविषयी आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी नगरविकासमंत्री सुरेश खन्ना यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर शौचालय दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. (कुंभक्षेत्री संत-महंत हिंदु समाजाच्या संघटनासाठी उपस्थित रहातात. त्यांना अशा प्रकारे मागण्या करण्यासाठी वेळ द्यावा लागणार असेल, तर प्रशासन काय कामाचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अतीमहनीय व्यक्तींचा कुंभक्षेत्री अनाठायी वावर नकोच ! – संत-महंतांची मागणी
‘मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या दौर्यांमुळे कुंभमेळ्यातील व्यवस्था बिघडू लागली आहे. सर्व अधिकारी स्वतःच्या मर्जीप्रमाणे दौरे करत आहेत. दौर्याच्या वेळी संत आणि श्रद्धाळू भाविक यांना ठिकठिकाणी रोखले जात आहे. त्यांच्या दौर्यांमुळे शहर आणि कुंभमेळा क्षेत्र येथील सर्व कामे थांबवली जातात. त्यामुळे अतीमहनीय व्यक्तींनी कुंभक्षेत्री सतत न येता वेळ निश्चित करून यावे’, अशी मागणी संत आणि महंत यांनी केली.
संतांना आकारले जात आहे वीजदेयक !
हज यात्रेला सवलत देणारे सरकार कुंभमेळ्यातील साधू-संतांकडून मात्र विजेचे देयक आकारते, हे लक्षात घ्या !
कुंभक्षेत्री तात्पुरत्या छावण्यांमध्ये रहाणार्या संतांकडून वीज देयकांचे शुल्कही आकारले जात असल्याने संतांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. याविषयी आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज म्हणाले की, पैसे वसूल करण्याची ही नवीन प्रथा चालू झाली असून ती त्वरित रोखली पाहिजे. (संतांनी असे म्हणणे सरकारला लज्जास्पद ! सरकार एकीकडे कुंभमेळ्यासाठी जाणार्या भाविकांच्या रेल्वेच्या तिकिटावरील अधिभार रहित करते, तर दुसरीकडे साधू-संतांकडून वीजदेयक वसूल करते ! सरकारची ही भूमिका म्हणजे ‘एका हाताने द्यायचे आणि दुसर्या हाताने काढून घ्यायचे’, अशी असून ही हिंदूंची घोर फसणूक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात