रत्नागिरी : राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी श्रीराममंदिर रामआळी, रत्नागिरी येथे ९ आणि १० जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अन् तालुक्यातील पावस येथे श्रीराम मंदिरामध्ये १० जानेवारी या दिवशी श्रीरामाला प्रार्थना आणि सामूहिक नामजप करण्यात आला.
रामआळी येथील श्रीराममंदिरात सामूहिक नामजपासाठी ११० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी रामनामजप आणि श्रीरामाला ‘राममंदिर उभारण्यातील अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यात आली. या वेळी नामजपात सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी नामजपामुळे आनंद अनुभवल्याचे सांगितले. तसेच ‘सामूहिक रामनामजपाचे आयोजन करणार्या हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे सांगितले.
आम्ही प्रतिदिन मंदिरामध्ये नामजप लावू ! – विजय देसाई, श्रीराममंदिराचे व्यवस्थापक
श्रीराममंदिराचे व्यवस्थापक श्री. विजय देसाई यांनी श्रीराम नामजपाची ऑडिओ ध्वनीचकतीची मागणी केली आणि सांगितले की, आम्ही प्रतिदिन मंदिरामध्ये नामजप लावू. या दोन दिवसांत आमचा खूप चांगल्या पद्धतीने नामजप झाला आणि आम्हाला अतिशय आनंद मिळाला. तुमच्या धार्मिक कार्याला आमचे नेहमी सहकार्य राहील.
श्री. देसाई यांनी नामजप चालू होण्याच्या वेळेपूर्वी बैठकव्यवस्था, तसेच माईक आणि ध्वनीक्षेपक व्यवस्थाही करून ठेवली होती. या नामजपामध्ये मंदिराच्या व्यवस्थापकांसह सेवेकरीही सहभागी झाले होते.
रामनामजपामुळे आम्हाला खूप आनंद झाला ! – दिलीप कुलकर्णी, धर्मप्रेमी
१० जानेवारी या दिवशी नामजपामध्ये सहभागी झालेले धर्मप्रेमी श्री. दिलीप कुलकर्णी यांनी नामजपानंतर भ्रमणभाषवरून संपर्क करून सांगितले. ‘‘मी माझ्या कुटुंबियासमवेत नामजपामध्ये सहभागी झालो होतो. आम्हाला खूप आनंद मिळाला. यापुढे कोणतीही सेवा असेल, तरी आम्हाला सांगा समितीच्या कार्यासाठी आम्ही यथाशक्ती साहाय्य करू.
नामजपासाठी मंदिर व्यवस्थापनाने मंदिर परिसरातील धर्मप्रेमींना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी बसून नामजपात सहभागी होता यावे, यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय केली होती. यामुळे त्यांनाही नामजपाचा लाभ घेता आला.
पावस येथे श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाला प्रार्थना आणि नामजप
पावस येथील श्रीराम मंदिरामध्ये सामूहिक नामजपाला २५ धर्मप्रेमी उपस्थित होते. मंदिराचे मालक श्री. आबा चिपळूणकर यांनी यासाठी आवश्यक ते साहाय्य केले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सुभाष पावसकर, माजी सरपंच श्री. वसंत नेने, मावळंगे गावचे उपसरपंच चंद्रहास पिलणकर, श्री. अभिजीत डोंगरे, मेर्वी येथील श्री. आेंकार अभ्यंकर, नरेंद्र संप्रदायचे डॉ. पिलणकर आणि सनातनचे साधक उपस्थित होते. या सामूहिक नामजपानंतर आरती म्हणून प्रसाद वाटून नामजपाची सांगता करण्यात आली.