राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी अक्षयवटाचे दर्शन होणार नाही !
प्रयागराज : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयाग येथील ४५० वर्षांपासून बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला पवित्र ‘अक्षयवट’ सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नुकताच खुला केला. या अक्षयवटाचे २ दिवसांत ६० सहस्र भाविकांनी दर्शन घेतले आहे. भाविक सकाळी ६ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत या परमपवित्र वटवृक्षाचे दर्शन घेत आहेत. असे असले, तरी कुंभमेळ्यातील राजयोगी स्नानाच्या दिवशी अक्षयवटाचे भाविकांना दर्शन घेता येणार नाही. त्या दिवशी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मोतीलाल नेहरु राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या एका अहवालानुसार प्रशासनाने घेतला आहे.
१५ आणि २१ जानेवारी, तसेच १० अन् १९ फेब्रुवारी आणि ४ मार्च या दिवशी राजयोगी स्नान होणार आहे. या वेळी कुंभमेळ्यात भाविकांची प्रचंड गर्दी असेल. त्यामुळे अक्षयवटाचे दर्शन होऊ शकणार नाही. प्राचीन किल्ल्याजवळ नवीन रस्ता सिद्ध करण्यात आला असून तेथे अधिक गर्दी होऊ नये, असे सदर प्रौद्योगिकी संस्थेने सांगितले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात