वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी स्वत: जागृत होऊन समाजालाही जागृत करायचे आहे ! – डॉ. (सौ.) साधना जरळी
लांजा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आजारांचे, रुग्णांचे प्रमाण वाढतच चालले आहे. याला उपाय म्हणून वैद्यकीय सुविधांची निकडही वाढत आहे. रुग्णाला उपचारांसाठी जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जातो, तेव्हा साहाय्य मिळण्याऐवजी अनेक प्रकारच्या दुष्प्रवृत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते. यामध्ये रुग्णाचे देयक (बिल) अधिक रकमेचे आकारणे, रुग्णाला अनावश्यक तपासण्या करण्यास सांगणे, गरोदर मातांचे आवश्यकता नसतांना ‘सिझर’ करणे आदी गोष्टी आढळून येतात. वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेल्या अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समितीची’ स्थापना झाली. या माध्यमातून आपण स्वत: जागृत होऊन समाजालाही जागृत करायचे आहे, असे प्रतिपादन डॉ.(सौ.) साधना जरळी यांनी केले.
येथील कनावजेवाडीतील श्री. सखाराम देसाई यांच्या घरी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. शिबिराचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा ताम्हनकर यांनी केले.
या शिबिरामध्ये श्वसनसंस्थेची ओळख आणि घशात आगंतुक वस्तू गिळणे या संदर्भातील मार्गदर्शन डॉ.(सौ.) साधना जरळी आणि सौ. समृद्धी सनगरे यांनी केले. भाजणे, पोळणे या संदर्भात मार्गदर्शन डॉ.(सौ.) गौरी याळगी आणि श्री. संजय माने यांनी केले. यासमवेत श्वसनमार्गातील वस्तू काढणे आणि अन्य प्रायोगिक भाग घेण्यात आले. या शिबिराचा लाभ ६८ शिबिरार्थिनी घेतला.