कुंभमेळा प्रयागराज २०१९
भगवान सूर्यनारायणाने रात्री २ वाजता मकर राशीत संक्रमण करताच प्रयागतीर्थावरील प्रथम अमृतस्नानाचा दिनू जणू उजाडला. पहाटे ३.३० वाजता सर्व आखाड्यांच्या शिबिरांमध्ये अमृतस्नानाच्या दृष्टीने नागा, संन्याशी, बैरागी, दिगंबर, महंत आदींची धावपळ चालू झाली. सनातनच्या शिबिरामधूनही आम्ही पहाटे ३.३० वाजता उठून पहाटे ४ वाजता संतांच्या स्वागतासाठी सिद्ध झालो होतो. आखाड्यांतील सर्व संत-महात्मे देवनदी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर अमृतस्नान करणार होते. आम्ही पहाटे महानिर्वाण आखाड्यात पोहोचलो, तेव्हा सर्व स्नानास सज्ज झालेल्या साधूंना आराध्य देवतेसमोर पुष्पमाळांनी सजवले जात होते आणि भस्मधारणविधीद्वारे भस्म चोळले जात होते.
पहाटे ७ अंश सेल्सियस पारा असतांना हे साधू-महंत लंगोटीवर होते किंवा नग्न होते. त्यांना थंडीचे भानही नव्हते. सकाळी ते सारे नग्न होते; पण कोठेही अश्लीलता नव्हती. अंगाला भस्म चोळून आणि हातात गदा, तलवार, त्रिशूळ इत्यादी पारंपरिक शस्त्रे धारण करून हे साधू अमृताची अनुभूती देणार्या स्नानास सिद्ध झाले होते.
श्री. चेतन राजहंस, सहसंपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह
आखाड्यांचा राजशिष्टाचार !
पंतप्रधान, राष्ट्रपती आदींच्या दौर्याच्या वेळी कोणी पुढे जायचे किंवा मागे रहायचे, हे जसे ठरलेले असते, तसेच आखाड्यांमध्येही पुढे, मधे आणि मागे कोण उभे रहाणार, याचा क्रम ठरलेला असतो. त्यात एकप्रकारची शिस्त कटाक्षाने पाळली जाते. आखाड्यांमध्येही कोणी प्रथम स्नान करायचे, द्वितीय स्नान करायचे, हे सारे ठरलेेले असते. या सनातन परंपरा अव्याहतपणे आजही चालू आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
संतांच्या स्वागताची सनातन परंपरा
संतांचे स्नान निर्विघ्नपणे व्हावे, यासाठी प्रशासन आणि पोलीस-सेनादले कार्यरत झाली होती. जवळजवळ पोलीस आणि निमलष्करी दलाच्या ८० कंपन्या त्रिवेणी क्षेत्रात कार्यरत होत्या. आम्ही पत्रकार म्हणून महानिर्वाणी आखाड्याच्या जत्थ्यासह त्रिवेणी संगमाकडे प्रस्थान केले, तेव्हा त्रिवेणी मार्गावर सनातन संस्थेच्या साधकांनी हातात ‘हार्दिक स्वागत’चे बॅनर्स आणि झेंडे घेऊन संत-महंतांचे स्वागत केले. ‘हर हर महादेव’चा उद्घोष आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा जयघोष हे या स्वागताचे वैशिष्ट्य होते. आम्ही पहाटे ५.३० वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये संगमतीर्थावर पोहोचलो, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा भाविक त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले आम्ही पाहिले. एका पोलिसाने सांगितले की, रात्री १२ वाजल्यापासूनच लाखो लोक संतांचे अमृतस्नान पहाण्यासाठी जमलेले आहेत. एवढी थंडी असूनही ते मोठ्या श्रद्धेने संगमतीर्थावरील रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. साधू-संतांचे स्वागत करण्याची ही परंपरा गेली कित्येक वर्षे जपली जात होती. उत्तरप्रदेश शासनानेही अमृतस्नानासाठी आलेल्या संतांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली.
अमृतस्नानाचे माहात्म्य !
समुद्रमंथनानंतर अमृतप्राप्तीसाठी देवासुरांमध्ये १२ दिवस, म्हणजे पृथ्वीवरील कालानुसार १२ वर्षे युद्ध झाले. त्यात पृथ्वीवर ४ वेळा अमृतकुंभ ठेवला गेला. ज्या ४ स्थानी अमृतकुंभ ठेवला गेला, तेथे अमृतकण पडले आणि तेथे हा मेळा प्रत्येक १२ वर्षांनी भरतो. अमृतकणांच्या प्राप्तीसाठी होणारे हे स्नान अद्वितीय आहे. हा योग सामान्य भाविकासाठी पुण्यप्रद आहे. त्यात पापांचे विमोचन करण्याची तळमळ आहे आणि मोक्षप्राप्तीची आसही आहे. गंगामाता पापांचे परिमार्जन करते. तिच्यात साठलेले पाप संतांच्या चैतन्याने नष्ट होते; म्हणून भाविकांच्या पूर्वी सारे संत गंगेत स्नान करतात. शाहीस्नान म्हणून प्रसिद्ध असणारे हे प्रथम अमृतस्नान मकरसंक्रांतीच्या दिवशी केले जाते. या पवित्रदिनी अनुमाने १ कोटीहून अधिक भाविकांनी गंगास्नान केले, तेव्हा नास्तिकतावाद्यांसाठी ती मोठी चपराक होती. गंगेवर आणि त्या गंगास्नानावर श्रद्धा ठेवणारे, त्यासाठी रात्रभर जागणारे, १०-१५ कि.मी. पदभ्रमण करणारे भाविक ही भारतातील आस्तिकतेची परंपरा आहे. नास्तिकतावाद्यांच्या कार्यक्रमांना १०० लोकही येणे कठीण असते, तेथे ही आस्तिकता महत्त्वाची आहे.
असा हा अमृतस्नानाचा महिमा !
पापांचे परिमार्जन आणि मोक्षप्राप्ती हा गंगास्नानाचा पाया आहे. धर्मशास्त्रात म्हटले आहे की, ज्याची जशी श्रद्धा असेल, तसे त्याला फळ मिळते. जे केवळ कर्मकांड म्हणून स्नान करतात, त्यांना तसे पुण्य मिळेल. जे हौशे-गवशे आहेत, त्यांना त्यानुसार फळ मिळेल. पापी व्यक्तीला पापाविमोचनाची तळमळ असेल, तर त्याला आत्मशांती लाभेल आणि मोक्षाची तळमळ असलेल्या मुमुक्षुला मोक्षप्राप्तीचा मार्ग गवसेल. असा अमृतस्नानाचा महिमा आहे. त्यासाठी भरणारा स्नानार्थींचा मेळा आम्ही ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवला !
(श्री. चेतन राजहंस हे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात