अकोला : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जानेवारी मासात पाच लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आल्या. प्रचंड थंडी असूनही ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या या सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘राष्ट्राची सद्यस्थिती आणि त्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, व्यष्टी-समष्टी साधनेचे महत्त्व याविषयी आम्हाला प्रथमच एवढी अनमोल माहिती मिळाली’ अशी उपस्थित हिंदूंची सकारात्मक आणि उत्साहवर्धक प्रतिक्रिया सर्व सभांमधून दिसून आली.
खरप (बु.) येथील पहिल्याच हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंभर ग्रामस्थ उपस्थित होते. सभेची पूर्वसिद्धता गावात सध्या चालू असलेल्या दोन धर्मशिक्षणवर्गांतील तरुणांनी केली. या सभेला समितीचे श्री. धीरज राऊत यांनी संबोधित केले. सभेनंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दोन स्वरक्षण प्रशिक्षणवर्गांची मागणी करण्यात आली.
गांधीग्राम येथील गांधी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या दुसर्या सभेलाही पुष्कळ थंडी असूनही ६० धर्माभिमानी शेवटपर्यंत उपस्थित होते. स्थानिक तरुणांनीच सभेची पूर्वसिद्धता आणि प्रसार केला. रिधोरा या गावात धर्माभिमान्यांनी पाक्षिक धर्मशिक्षणवर्गाची मागणी या वेळी केली. येथील सभेला समितीचे श्री. धीरज राऊत यांनी संबोधित केले.
मोरगाव (भाकरे) येथील सभेत जवळच असलेल्या गायगाव येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांनीच सभेची पूर्वसिद्धता आणि प्रसार केला. श्री. श्याम सांगुनवेढे यांनी साधना या विषयावर, तर समितीचे श्री. धीरज राऊत यांनी राष्ट्र-जागृती यावर मार्गदर्शन केले. एकूण १२५ धर्माभिमानी उपस्थित होते.
गुडधी या गावी श्री हनुमान मंदिरात एक सभा घेण्यात आली. येथील सभेला महिलांचा प्रतिसाद अधिक होता. समितीचे श्री. श्याम सांगुनवेढे आणि कु. रेवती कानशुक्ले यांनी विषय मांडला. एकूण ६० जणांची उपस्थिती होती. या सभेनंतरही उपस्थितांनी पाक्षिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.