१. रुग्णांना अनावश्यक चाचण्या करायला सांगून फसवणारी रुग्णालये !
१ अ. आधुनिक वैद्यांनी तपासण्यापूर्वीच चिकित्सालयातील कर्मचार्यांनी काही चाचण्या करण्यास सांगणे : ‘एके दिवशी मी अनेक वर्षांपासून आमच्या परिचित असलेल्या एका आधुनिक वैद्यांच्या चिकित्सालयात गेले होते. माझ्यासह एक साधिकाही होती. मी तपासणीची वेळ येण्याची वाट पहात असतांना एक महिला कर्मचारी माझ्याकडे आली आणि तिने मला माझ्या उपचारांविषयीची ‘फाईल’ मागितली (मी त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून जात आहे.) त्या वेळी तिने माझ्यासह आलेली साधिका नवीन असल्याची निश्चिती करून घेतली. ५ मिनिटांनी ती महिला पुन्हा माझ्याकडे आली. तिने मला माझी ‘फाईल’ परत देतांना शारीरिक चाचण्या करण्यासाठी एक सूची दिली, ज्यांतील चाचण्या मी आधुनिक वैद्यांना भेटण्यापूर्वी करायच्या होत्या. ते पाहून मी त्या महिलेला विचारले, ‘‘मी आधुनिक वैद्यांना भेटण्यापूर्वी या चाचण्या का करायच्या आहेत ?’’ त्यावर तिने मला ‘त्या चाचण्या करणे आवश्यक असून त्याविषयी मला अधिक ठाऊक नाही’, असे सांगितले. मी आधुनिक वैद्यांना एक वर्षापूर्वी भेटलेली असल्याने एकही चाचणी परस्पर न करण्याचे ठरवले.
१ आ. त्या रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळणार्या आधुनिक वैद्यांच्या मुलीनेही चाचण्या करण्यासाठी आग्रह करणे आणि आधुनिक वैद्यांंना भेटल्यावर कोणतीही चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे लक्षात येणे : काही वेळाने त्या रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळणारी आधुनिक वैद्यांची मुलगी तिथे आली आणि मला ‘चाचण्या केल्या पाहिजेत’, असे सांगू लागली. तेव्हा ‘मी आधुनिक वैद्यांना भेटल्याविना चाचण्या करणार नाही’, असे तिला सांगितले. त्यावर तिने मला ‘तुम्हाला थांबायला लागेल’, असे सांगितले. मी थांबायला सिद्ध असल्याचे आणि ‘आधुनिक वैद्य मला ओळखत असल्याने त्यांनी सांगितले, तरच मी चाचण्या करणार’, असे तिला सांगितले. जेव्हा तिने चाचण्या करण्याचा पुन्हा आग्रह धरला, तेव्हा मी तिला माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर ती निघून गेली. जेव्हा मी आधुनिक वैद्यांंना भेटले, तेव्हा त्यांनी मला कोणतीही चाचणी करण्यास सांगितली नाही.
२. चिकित्सालयात एक बिस्किट ५ रुपयांना विकून रुग्णांची लुबाडणूक केली जाणे
एके दिवशी त्याच चिकित्सालयात गेले असतांना भूक लागली; म्हणून मी कॉफी आणि बिस्किटे घेतली. मी त्याचे पैसे द्यायला गेल्यावर मला समजले, ‘तिथे एका बिस्किटाची किंमत ५ रुपये होती. ती बिस्किटे त्यांनी बाहेरून मागवली होती आणि त्यावर ‘सुटी बिस्किटे विकण्यास प्रतिबंध आहे’, असे लिहिले होते.’ त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य वाटले; पण त्या परिस्थितीत मी त्यांना पुढे काही विचारू शकले नाही.
३. अन्य कटू अनुभव
अ. एका रुग्णालयात औषधे त्यांच्या मूल्यापेक्षा अधिक दराने विकली जात होती.
आ. बर्याच रुग्णालयांत आणि चिकित्सालयांत, त्यांच्या औषध दुकानात उपलब्ध असलेली औषधेच लिहून दिली जातात. ‘आपणही औषधांच्या त्याच दुकानातून औषधे विकत घ्यावीत’, असेही आधुनिक वैद्य सुचवतात. ‘आपल्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत’, असे सांगितले, तरच ते आपल्याला दुसरी औषधे लिहून देतात.
इ. काही रुग्णालयांत रक्ताच्या तपासणीचा अहवाल आणि एक्स-रेचा अहवाल रुग्णाला दिला जात नाही. त्यामुळे रुग्णाला तपासणीसाठी पुन्हा त्याच रुग्णालयात जावे लागते.
ई. एकदा एक आधुनिक वैद्य आणि तपासणी प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी लॅब) यांच्यात ‘कमिशन’ पद्धत चालू असल्याचे माझ्या लक्षात आले. ते आधुनिक वैद्य रुग्णांना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून प्रत्येक रुग्णामागे ४०० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळवत होते.’
– कु. प्रणिता सुखटणकर, कोची सेवाकेंद्र, केरळ. (१९.१२.२०१८)
आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आम्हाला कळवा.
चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !
पैसे लुबाडणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]