प्रयागराज (कुंभनगरी) : भाजप असो वा काँग्रेस, कोणताही राजकीय पक्ष अयोध्येत रामाचे मंदिर उभारू शकत नाही. कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे प्रतिपादन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी केले.
ते प्रयागराज येथील श्री मनकामेश्वर मंदिरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना बोलत होते. काँग्रेसने राममंदिर उभारण्याचे आश्वासन दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो, असे विधान विश्व हिंदु परिषदेने केले आहे. त्यावर भूमिका मांडतांना शंकराचार्य बोलत होते.
शंकराचार्य पुढे म्हणाले की,
१. काँग्रेसशी आमचा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझ्यासाठी सर्वच राजकीय पक्ष समान आहेत. भारतातील राजकीय पक्ष आणि सरकार यांनी निधर्मी घटनेचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. मग ते मंदिर कसे बांधू शकतील ? काँग्रेस वा भाजप असे राममंदिर उभारण्याचे विधान करत असतील, तर ती फसवणूक आहे. हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
२. ‘राममंदिर उभारण्यासाठी तुम्ही अयोध्येत जाणार आहात का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी शंकराचार्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘हो. राममंदिराचा शिलान्यास करण्यासाठी मी कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाणार आहे. श्रीरामजन्मभूमी येथे अद्याप शिलान्यास झालेला नाही. तो करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. शिलान्यास कसा करायचा याविषयी धर्मग्रंथात सांगितले आहे. त्यानुसार कृती केली जाईल.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात