सरकारने कायदा करून राममंदिर उभारावे ! – हिंदूंची एकमुखी मागणी
अकोला : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु रामचंद्रांची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी श्रीराम जन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे, असे शिक्कामोर्तब केले आहे. गेली आठ वर्षे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली आमची न्यायव्यवस्था ‘राममंदिर आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? संसदेत कायदा करून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केली. या मागणीसाठी १२ जानेवारी या दिवशी अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी मनोगत व्यक्त करतांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. उदय महा म्हणाले की, नुकत्याच पुणे येथे झालेल्या आमच्या बैठकीत राममंदिर बांधण्याविषयी ठराव पारित करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
या आंदोलनात ह.भ.प. गिरीष महाराज कुळकर्णी पूर्णवेळ सहभागी झाले होते. ते या वेळी म्हणाले की, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ या उक्तीनुसार हिंदु जनजागृती समितीचे कार्य चालू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला यश हे येणारच आहे. आपण त्यासाठी रामभक्ती वाढवूया.
या आंदोलनात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष श्री. नितीन रेलकर, उपाध्यक्ष श्री. रघुवीर देशपांडे, जिल्हा महासचिव डॉ. प्रभाकर जोशी, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. चिंतामणी कुळकर्णी, तसेच धर्माभिमानी श्री. अरूण दुधाळकर, श्री. मोहन अंबारखाने, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.
विशेष
या आंदोलनात प्रथमच आलेल्या ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (भारत देश)च्या राष्ट्रीय प्रशिक्षक सौ. माधुरी देशमुख यांना आंदोलनाच्या वेळी पूर्णवेळ आनंद जाणवला.