प्रयागराज (कुंभनगरी) : काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचे चित्रप्रदर्शन येथील सेक्टर १५ मध्ये भूमानिकेतन पीठाधीश्वर पंडालमध्ये लावण्यात आले आहे. चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट दिली. पहिल्याच दिवशी सकाळी झालेल्या उद्घाटन सत्रापासून रात्री ९ पर्यंत ५० हून अधिक साधू-संतांनी या चित्रप्रदर्शनाला भेट दिली.
बर्याचदा निमंत्रण दिल्यावर संत-महंत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेल्या चित्रप्रदर्शनाला भेट देण्यासाठी येतात. असे असले, तरी काश्मीर येथील विस्थापित हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव कथन करणार्या चित्रप्रदर्शन पहाण्यासाठी अनेक साधू-संत उत्स्फूर्तपणे येत होते. त्यात स्वामी भागवतानंद महाराज, स्वामी नरेंद्रानंद महाराज, स्वामी जगदीशस्वरूप महाराज, स्वामी आशुतोषानंद महाराज आणि स्वामी महेशानंद महाराज यांचा समावेश होता. हे पाच साधू-संत आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांना वाकून दंडवत घातला. सद्गुरु (डॉ.) पिंगळे त्यांना म्हणाले, ‘तुमच्यासारख्या संतांच्या कृपेनेच हे कार्य चालू आहे. तुम्हाला माझा नमस्कार !’ त्यानंतर ते साधू-संत आनंदी होऊन सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांच्याशी बोलू लागले. त्यातील एक स्वामी आशुतोषानंद महाराज सनातन आश्रम, रामनाथी येथे पूर्वी आलेले होते. या सर्व संतांना जवळच असलेल्या सनातनच्या धर्मशिक्षण आणि राष्ट्ररक्षणविषयक प्रदर्शन पहाण्यासाठी विनंती करण्यात आली.
काश्मिरी हिंदूंचे प्रदर्शन लागणार असल्याचे एका जिज्ञासूला एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीद्वारे समजले. तो बराच वेळ पत्ता शोधत प्रदर्शनस्थळी पोहोचला. सदर जिज्ञासू हिंदी पाक्षिक सनातन प्रभातचा वर्गणीदार झाला आणि त्याने ग्रंथ खरेदी केले. अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत होते. काही जणांनी ‘चित्रप्रदर्शनाचे पुस्तक आहे का’, अशी विचारणा केली.