कुंभमेळा प्रयागराज २०१९ : कुंभमेळ्यानंतर अयोध्या येथे संतांची बैठक होणार !
प्रयागराज (कुंभनगरी) : साधू, संत-महंत आणि विहिंपचे नेते यांनी भाजपला राममंदिराच्या सूत्रावरून घेरण्यास प्रारंभ केला आहे. त्यातच २१ जानेवारीला अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘राममंदिर व्हावे अशी भाजपची इच्छा नाही’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘सर्व संतांनी कुंभमेळा झाल्यानंतर अयोध्या येथे एकत्र येऊन राममंदिराच्या विषयावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
विहिंपकडूनही अप्रसन्नता व्यक्त !
अयोध्या येथे राममंदिर होण्यासाठी भाजपकडून काहीच प्रयत्न होत नसल्याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर आता विश्व हिंदु परिषदेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. विहिंपच्या नेत्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राममंदिर निर्माण होईल, अशी कोणती आशा राहिलेली नाही. (भाजप साडेचार वर्षे सत्तेत असतांना विहिंपने राममंदिर उभारण्यासाठी भाजपवर का दबाव आणला नाही ? आता अप्रसन्नता व्यक्त करून काय उपयोग ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात