कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज, (कुंभनगरी) : पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१ जानेवारीला त्रिवेणी संगमावर कल्पवासी म्हणजेच भाविक यांचे दुसरे स्नानपर्व उत्साही आणि भावपूर्व वातावरणात पार पडले. एकूण ६० लक्ष भाविकांनी ‘गंगा माता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत त्रिवेणी संगमावर स्नान केले. पौष पौर्णिमेचे व्रत आणि पूजन २० जानेवारीपासूनच चालू झाले होते. या निमित्ताने २१ जानेवारीला स्नान आणि दान करणे पुण्यकारक असल्याने भाविकांनी या दिवशी स्नान, दान आणि जप करण्याला महत्त्व दिले. आज राजयोगी स्नान नसल्याने भाविकांना व्यवस्थित स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दुपारी १२ वाजेपर्यंत ४० लक्ष भाविकांनी गंगास्नान केले होते. नंतर भाविकांची गर्दी वाढली. पवित्र स्नानानंतर आजपासून भाविक संगमावरील तंबूत (टेन्ट)मध्ये राहून १ मास भजन-कीर्तन करतील. मोक्षप्राप्तीसाठी संतांच्या सान्निध्यात ते त्यांचा वेळ घालवतील, तसेच सुख-सुविधांचा त्याग करून दिवसांतून १ वेळा भोजन आणि ३ वेळा गंगास्नान करून तपस्वीचे जीवन जगतील.
न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवणारे प्रशासन आणि पोलीस !
न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून त्रिवेणी संगमावर ध्वनीचित्रीकरण, छायाचित्र काढू नये, असे आवाहन केले जात होते, तर दुसरीकडे त्यांच्याकडूनच सीसीटीव्ही कॅमेरा लावून आणि पोलीस यांच्याकडून ध्वनीचित्रीकरण केले जात होते.
पोलिसांच्या या आवाहनाला भाविक, पत्रकार आणि वृत्तवाहिनी यांचे छायाचित्रकार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावून संगमावर ध्वनीचित्रीकरण करून छायाचित्रेही काढली.
क्षणचित्रे
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसिद्धी देणारे मोठे फलक त्रिवेणी संगमावर उभारण्यात आले होते; मात्र तेथे अन्य संघटनांना फलक लावण्यास मनाई करण्यात आली होती.
२. लहान मुले कचर्यासाठी ठेवलेल्या डब्यातच लघुशंका करत होती. याकडे त्यांचे आई-वडील दुर्लक्ष करत होते.
३. प्रशासनाने महिला भाविकांसाठी इतरत्र कपडे पालटण्याची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे स्नान झाल्यावर संगमावरच स्त्री-पुरुष भाविक गर्दीतच कपडे पालटत होते.
४. स्नान झाल्यानंतर बर्याच साधूंनी संगमावर पूजा, स्तोत्र आणि मंत्र यांचे पठण केले.
५. काही भाविक स्नान झाल्यानंतर एकत्रितपणे टाळ, मृदुंग यांच्या गजरात भजन म्हणत निवासाकडे जात होते.
पोलिसांनी ‘हार्दिक स्वागत’चे फलक काढण्यास भाग पाडले !
त्रिवेणी संगमावर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘भाविकांचे हार्दिक स्वागत’ असेे फलक हातात धरले होते. यांतील काही फलक साधकांनी पहाटे ४ वाजल्यापासूनच हातात धरले होते. सकाळी ८.३० नंतर पोलिसांनी हे फलक काढण्यास साधकांना भाग पाडले. पोलिसांनी फलक लावण्यास मनाई केली. (या फलकांमुळे सुरक्षायंत्रणेला बाधा येत होती कि आणखी काय अडचण येत होती, हे पोलिसांनी सांगावे. अन्यथा ‘सनातनद्वेषापायीच पोलीस अशी कृती करत होते’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
दुसर्या स्नानासाठी अशी केली होती प्रशासनाने सिद्धता…
-
- ५.५ किलोमीटरपर्यंत ३५ स्नान घाट सिद्ध
- ९ प्रवेशमार्गांतून कुंभमेळा क्षेत्रात प्रवेश
- २० किलोमीटरपर्यंत पोलिसांनी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारले
- ४५ सहस्र एल्ईडी विद्युत् दिवे लावले
- १ लक्ष २२ सहस्र शौचालयांची व्यवस्था
- २५ सहस्र स्वच्छता कामगारांची नियुक्ती
- ५ लक्ष ५ सहस्र वाहनांसाठी ९५ वाहनतळे
- टिहरी धरणातून ५ सहस्र, तर नरौरा धरणातून २ सहस्र क्यूसेक पाणी गंगानदीत सतत सोडले जात होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात