प्रयागराज (कुंभनगरी) : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिर व्हावे, असे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांना वाटत नाही, असे मत काशी सुमेरु पीठाधीश्वराचे जगद्गुरु स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे. कुंभमेळ्यात असलेल्या त्यांच्या शिबिरात ते बोलत होते.
जगद्गुरु स्वामी नरेंद्रानंद सरस्वती पुढे म्हणाले की
१. विहिंप आणि रा.स्वं. संघ या दोन्ही संघटना अनेक वर्षांपासून राममंदिराच्या नावावर संत आणि जनता यांची दिशाभूल करत आहेत.
२. जनतेला भावनिक रूपाने जोडण्यासाठी आंदोलन, संत संमेलन करण्याचा देखावा केला जात आहे.
३. सध्या भाजपकडे केंद्र आणि प्रदेश यांची सत्ता असून पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आहे. सरकारची इच्छा असती, तर मंदिराच्या उभारणीचा प्रारंभ योग्य दिशेने चालू झाला असता; मात्र मंदिराविषयी सरकारचे काहीही प्रयत्न होत नाहीत.
४. ना सर्वोच्च न्यायालयात योग्य सुनावणी होते, ना राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश लागू होण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखे आहे.
५. संत, समाज त्यांच्या कार्यप्रणालीचा कडाडून विरोध करेल. या वेळी त्यांनी अर्धकुंभला कुंभ नाव देण्यासही विरोध केला. सरकारने धर्मशास्त्राच्या मान्यतेला पालटण्याचा प्रयत्न केला आहे. हे धर्म आणि समाज यांच्यासाठी योग्य नाही. सरकारच्या या कृत्यामुळे संतांमध्ये अप्रसन्नता (नाराजी) आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात