प्रयागराज (कुंभनगरी) : येथील सनातन संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास दूरदर्शनसह विविध वृत्तवाहिन्या, ‘एन्बीटी’ (नवभारत टाइम्स), ‘जनसत्ता ऑनलाइन पोर्टल’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ या प्रथितयश वर्तमानपत्रांनी दखल घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दूरदर्शन वाहिनीच्या प्रतिनिधीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची, तर ‘जनसत्ता ऑनलाइन पोर्टल’च्या प्रतिनिधीने समितीचे श्री. विनय पानवळकर यांची मुलाखत घेतली.
कुंभमेळ्यातील धर्मजागृती करण्याविषयी सदर प्रसारमाध्यमांना मुलाखत देतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, कुंभमेळ्यात साधू-संत यांच्याकडून कथा, प्रवचने, योगासन शिबिरे आयोजित करण्यात येतात; मात्र सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयी प्रबोधनात्मक प्रदर्शने लावण्यात आली आहेत. काळानुसार ‘धर्म’ आणि ‘धर्मावरील आघात’ यांविषयी जिज्ञासूंना माहिती देणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातनने कुंभमेळ्यात ‘धर्मशिक्षण’समवेतच ‘राष्ट्र-धर्म रक्षण’ या संदर्भातील प्रदर्शने लावली आहेत. या प्रदर्शनांच्या माध्यमांतून लोकांमध्ये धर्माविषयीची श्रद्धा आणखी वृद्धींगत होऊन त्यांना आपल्या धर्माचा अभिमान वाटतो. त्यामुळे धर्मकार्यासाठी लोक पुढे सक्रीय योगदान देतात. ही प्रदर्शने महत्त्वाची असून हिंदु समाजाला बीजरूपाने कृतीशील करणारी आहेत.