वर्धा : केंद्र सरकारने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामजन्मभूमी (अयोध्या) येथे राममंदिर बांधण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करावा, सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी शाळा-महाविद्यालये यांमधून हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्माचे शिक्षण देण्यात यावे, तसेच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांचे उत्पादन, साठा, विक्री आणि वाहतूक यांवर १०० टक्के बंदी घालावी, मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील विकास भवनासमोर २२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी श्री. उत्तम दिघे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राममंदिर उभारण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करावा : नांदेड येथील धर्मप्रेमी नागरिकांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी
नांदेड : केंद्रशासनाने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम जन्मभूमी (अयोध्या) येथे राममंदिर उभारण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करावा, अशी मागणी येथील अपर जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी समविचारी संघटना, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी ‘तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांचे उत्पादन, साठा, विक्री आणि वाहतूक यांवर १०० टक्के बंदी घालणे, मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे, सुसंस्कारित भावी पिढी घडवण्यासाठी शाळा-महाविद्यालये यांमधून हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्माचे शिक्षण मिळावे, काशी विश्वनाथ ‘कॉरिडॉर’ निर्माण करतांना अनेक शिवलिंग नाल्यामध्ये फेकणारे कंत्राटदार आणि संबंधित उत्तरदायी शासकीय अधिकारी यांवर कारवाई करावी अन् ‘२६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखला जावा’, याविषयी संबंधित अधिकारी आणि खात्यांना सूचना देणे’, या मागण्यांचेही निवेदन देण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी जिल्हास्तरीय विषयासंबंधी योग्य कारवाई आणि सूचना संबंधित कार्यालयांना देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली.