धाडस असेल, तर प्रशासनाने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या सणांना असे उपक्रम राबवून दाखवावेत ! – रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती
- धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! हिंदु धर्मातील सण, व्रते आदींमागे धर्मशास्त्र आहे. असे असतांना त्याविषयी निधर्मी व्यवस्थेतील कुठलाही घटक विचारून घेत नाही आणि स्वतःच्या मनानुसार त्यात हस्तक्षेप करतो !
- भविष्यात मकरसंक्रातीला ‘वाण’ म्हणून आणखी काही वाटल्यास आश्चर्य वाटायला नको ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मकरसंक्रांतीनिमित्त ‘हळदी-कुंकू’ हा एक धार्मिक उपक्रम म्हणून राबवला जातो. हिंदु धर्मशास्त्रानुसार ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमात सात्त्विक वस्तूंचे वाण द्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारे ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाण म्हणून वाटणे, अत्यंत अयोग्य असून हा हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांचा हेतूतः केलेला अवमानच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला ‘सॅनिटरी नॅपकिन’चे वाटप करायचे असल्यास त्यांनी अवश्य करावे, आमचा त्याच्या वाटपाला विरोध नाही; पण वाण म्हणून ते हळदी-कुंकू कार्यक्रमातच का वाटायचे आहे ?
‘रमजान’ किंवा ‘ख्रिसमस’ या सणांच्या वेळी तुम्ही ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे धाडस दाखवणार आहात का ?, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचा मी तीव्र शब्दांत निषेध करते, असे येथील हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. अनुश्री गावसकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
‘सध्या प्रचलित हळदी-कुंकू कार्यक्रमातही अनेक ठिकाणी गृहोपयोगी किंवा प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण दिले जाते; पण धर्मशास्त्रदृष्ट्या असे करणे सयुक्तिक नाही. त्यामुळे सौभाग्याशी संबंधित कुंकू, करंडे आदी किंवा पूजेशी संबंधित उदबत्ती, कापूर, अत्तर, देवतांची चित्रे किंवा उपासनेसाठी पूरक अशा गोष्टी उदा. जपमाळ, आध्यात्मिक ग्रंथ यांसारख्या सात्त्विक वस्तूंचे वाण द्यावे’, असे आवाहन समस्त महिलांना रणरागिणी शाखेच्या वतीने आम्ही करत आहोत. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या प्रशासनाला हिंदूंच्या धर्मपरंपरेमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. जिल्हा प्रशासनाला धार्मिक गोष्टींत काही सुचवायचे असेल, तर त्यांनी धर्माचार्य किंवा संत-महंत यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मपरंपरा, सण, उत्सव आणि प्रथा यांमध्ये केला जाणारा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा परिषदेने हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्याचा निर्णय रहित करावा अन्यथा हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणीही सौ. गावसकर यांनी या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.