सातारा येथे हिंदु महासभा आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांची मागणी
ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा पूर्वेतिहास पहाता ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांच्या भाषणातून लक्ष्य करतात, जातीय तणाव निर्माण करतात, हे लक्षात येते. पोलीस हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे गांभीर्याने पहाणार कि नाही ?
सातारा : २५ जानेवारी या दिवशी शहरातील राजवाडा परिसरातील गांधी मैदान येथे एम्आयएम् पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतील वक्त्यांना अखिल भारत हिंदु महासभा आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनांनी विरोध दर्शवला असून ही सभा रहित करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनांमध्ये म्हटले आहे की,
१. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर शांत झालेले समाजमन पुन्हा कलुशीत करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी चालवला आहे, अशी शंका निर्माण होते. अखिल महाराष्ट्राला पूजनीय असणार्या संभाजीराव भिडेगुरुजी यांचा संबंध कोरेगाव भीमा प्रकरणाशी जोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
२. ‘आमच्याकडे अख्खा नक्षलवाद आहे’, अशी कोल्हेकुई करणार्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्श पथावरून मार्गक्रमण करणारे धारकरी कधीच भीक घालणार नाहीत.
३. ओवैसी बंधूंनी ‘१५ मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, १०० कोटी हिंदूंना संपवतो’, असे देशद्रोही वक्तव्य केले होते. तसेच हिंदु धर्मातील साधू, संत आणि महंत आदींना जाहीर सभेत शिवीगाळ केली होती. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी धार्मिक स्वातंत्र्यही दिलेले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये.
४. आंबेडकर आणि ओवैसी यांची सभा झाल्यास समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच पुन्हा कोरेगाव भीमाची पुनरावृत्ती झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? तरी पोलीस आणि प्रशासनाने ही सभा रहित करून कायदा आणि सुव्यवस्था राखावी. सभेस अनुमती दिल्यानंतर उद्भवणार्या गंभीर परिणामांना सर्वस्वी पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी राहील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात