रायगड : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी महाविद्यालयात आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्यांवर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अन् प्रशासन यांना रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेच्या अंतर्गत हे उपक्रम घेण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ए.बी. विश्वकार यांना, तर पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदने देण्यात आली. ‘खांदा कॉलनी’तील चांगूकाना ठाकूर महाविद्यालयात, तसेच कळंबोली येथील ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी’च्या महाविद्यालयात निवेदने देण्यात आली. कळंबोली येथील ‘के.एल्.ई. सोसायटी’च्या वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रसेन मौर्य यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, ‘‘हा उपक्रम पुष्कळ चांगला आहे. आम्ही आमच्या मुलांना खाली पडलेले झेंडे उचलून एकत्र करायला सांगतो. तुम्ही प्रजासत्ताकदिनाला येऊन आमच्या मुलांचे प्रबोधन केल्यास आम्हाला आवडेल.’’