साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामाचे भव्य मंदिर अयोध्येत व्हावे’, यासाठी ठिकठिकाणी अनेक आंदोलने होत आहेत. रामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, न्यायालयीन आदी विविध स्तरांवर अनेक प्रयत्न होऊनही गेल्या ४९० वर्षांपासून हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. त्यामुळे आता साक्षात रामालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.
१. ‘अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी’, यासाठी ‘श्रीरामनामाचा गजर’ हे अभियान राबवण्यात येणे
‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥’ (दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६) , असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. त्यानुसार ‘राममंदिर उभारण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करून रामाची कृपा संपादन करता यावी’, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ते १० जानेवारी २०१९ या काळात ‘श्रीरामनामाचा गजर’ हे अभियान राबवण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, गुजरात आणि उत्तरप्रदेश या ६ राज्यांत २६५ ठिकाणी हे अभियान पार पडले. त्यात हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, समविचारी संघटना, संप्रदाय आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. (‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ असे अभियानाचे हिंदी नाव आहे.)
२. अभियानाच्या वेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक नामजप आणि प्रार्थना करणे
या अभियानामध्ये ठिकठिकाणचे सहस्रो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांनी ‘राममंदिराच्या उभारणीत येत असलेले अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रभु श्रीरामाच्या चरणी सामूहिक प्रार्थना केली. या अभियानाच्या अंतर्गत भारतभरातील २५० ठिकाणी सामूहिक नामजप करण्यात आला, तसेच १० ठिकाणी आंदोलने आणि ५ ठिकाणी दिंड्या यांचे आयोजन करण्यात आले.
३. २८ आणि २९ जानेवारी या दिवशी हे अभियान राबवा !
२९.१.२०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयात राममंदिराच्या संदर्भातील पुढील सुनावणी होईल. त्यामुळे २८.१.२०१९ ला दिवसभर, तसेच २९.१.२०१९ या दिवशी सकाळी ६ ते १० या वेळेत वरील अभियान राबवावे. साधक आणि कार्यकर्ते यांनी आपल्या संपर्कातील संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी अन् हितचिंतक यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करावे.
४. अभियान राबवतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
अ. या अभियानाच्या वेळी भाविकांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा सामूहिक नामजप आपल्या परिसरातील श्रीराम, मारुति अथवा अन्य मंदिरात करावा. या नामजपाचा ‘ऑडिओ’ https://www.sanatan.org/mr/audio-gallery येथे उपलब्ध आहे. अभियानाच्या ठिकाणी नामजपाचा ऑडिओ लावून ठेवावा आणि त्याप्रमाणे उपस्थित भाविकांना नामजप करण्यास सांगावे.
आ. अभियानासाठी जमलेल्या प्रत्येक भाविकाला पोस्टकार्डवर पुढील आशयाचे पत्र लिहिण्यास सांगावे, ‘सर्वोच्च न्यायालयाला राममंदिराचा प्रश्न प्राधान्याचा वाटत नाही. आमच्यासाठी हा प्रश्न प्राधान्याचा आहे. कृपया या प्रकरणी लवकर सुनावणी करावी.’ भाविकांनी आपल्या मातृभाषेत लिहिलेली ही पत्रे सर्वोच्च न्यायालयाला पाठवावीत.
इ. अभियानाच्या ठिकाणी जमलेल्या भाविकांची छायाचित्रे काढावीत अथवा २ मिनिटांचे चलत्चित्र (व्हिडिओ) बनवावे. छायाचित्रे आणि चलत्चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi) अन् हिंदु जनजागृती समिती (@HinduJagrutiOrg) या ट्विटर खात्यास ‘टॅग’ करून पाठवावे. ट्वीट करतांना #RamNaamForRamMandir हा ‘हॅशटॅग’ वापरावा.
ई. अभियानाला उपस्थित भाविकांना ‘सप्ताहातून एक दिवस रामासाठी, रामराज्यासाठी, हिंदु राष्ट्रासाठी !’, असे आवाहन करता येईल.
५. अभियानाचा प्रसार करणे
५ अ. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून अभियानाविषयी सर्वांपर्यंत माहिती पोहोचवणे : सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमाद्वारे (‘सोशल मीडिया’द्वारे) शासन, प्रशासन, तसेच भाविक यांच्यापर्यंत या अभियानाची माहिती पोहोचवावी. न्यायालयात राममंदिर प्रश्नाविषयी सुनावणी असलेल्या दिवशी #RamNaamForRamMandir हा ‘हॅशटॅग’ वापरून अधिकाधिक ट्वीट करावे.
५ आ. ‘पुढील सामूहिक नामजप कोणत्या दिवशी आहे ?’, हे फलकावर लिहून किंवा कापडी फलकावर छापून मंदिरात लावावे. यामधून भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे.
राममंदिर निर्माणाला झालेला विलंब अक्षम्य आणि गंभीर आहे. ‘न्यायव्यवस्था हिंदूंना न्याय देईल’, अशी स्थिती नाही. त्यामुळे भाविकांनी राममंदिर उभारणीसाठी कृतीप्रवण होण्याची वेळ आली आहे. यास्तव देशभरातील सर्व आध्यात्मिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, रामभक्त आणि धर्मप्रेमी यांनी ‘श्रीरामनामाचा गजर’ हे अभियान आपापल्या भागात पुढाकार घेऊन राबवावे.
हिंदु बांधवांनो, राममंदिर उभारण्यासह ‘हिंदु राष्ट्र-जागृती’च्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण असलेल्या ‘श्रीरामनामाचा गजर’ या अभियानातून हिंदूऐक्याची वज्रमूठ बलशाली करा ! राममंदिर प्रश्नाविषयी न्यायालयात होणार्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी हे अभियान राबवून श्रीरामाची कृपा संपादन करा !’