हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या फलकावरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करण्यासाठी विदेशातून दूरभाष, तर पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अनुमती देण्यात दिरंगाई !
- हिंदु राष्ट्र स्थापनेच्या न्याय्य मागणीला विरोध करण्यासाठी विदेशातून दूरभाष येतात आणि पोलीस अन् प्रशासनही अशांचा कैवार घेतात, हे लक्षात घ्या !
- कर्नाटकमधील प्रशासनाला हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान प्रिय आहे; मात्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी आकस आहे !
शिवमोग्गा / मंगळूरू : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवमोग्गा आणि मंगळूरू या शहरांत २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकावरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेत हिंदुद्वेष्ट्यांनी सभेला मोठ्या प्रमाणात विरोध चालू केला आहे. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांना विदेशातून ‘इंटरनेट कॉल’ येत आहेत. श्री. चंद्र मोगेर यांना २२ जानेवारीपासून एकूण १५ ‘इंटरनेट कॉल’ आले आहेत, तर श्री. गुरुप्रसाद गौडा यांनाही अशाच प्रकारचे १४ ‘कॉल’ आले आहेत.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी घटनाबाह्य, तसेच समाजात फूट पाडणारी असल्याचा कांगावा करत व्हॉट्सअॅप, फेसबूक आदी सामाजिक संकेतस्थळांवर सभाविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे. यामुळे मंगळूरू येथे लावलेले सभेचे प्रसारफलक काढण्यासाठी महानगरपालिका समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहे, तसेच प्रसारासाठी ध्वनीवर्धकाद्वारे उद्घोषणा करण्यासाठीही अनुमती देण्यास आडकाठी आणत आहे. मंगळूरूतील एका पोलीस अधिकार्याने कार्यकर्त्यांना कार्यालयात बोलावून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी केली. शिवमोग्गा येथे सभा रहित करण्यासाठी दबाव आणला जात आहे.