कुंभमेळा प्रयागराज २०१९
- प्रयागराज कुंभमेळ्यात ६ फेबु्रवारीला सर्व पिठांच्या शंकराचार्यांच्या उपस्थितीत ‘संत संमेलना’चे आयोजन !
- ८ फेब्रुवारीला ‘शारदा कुंभ स्नाना’चे आयोजन !
- हिंदूंना शारदापीठाचे महत्त्व सांगण्यासाठी कुंभक्षेत्री विशेष प्रदर्शन !
प्रयागराज : शीख बांधवांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील करतारपूर कॉरिडोअरच्या (पाकव्याप्त काश्मीरमधील करतारपूर येथील गुरुद्वारा आणि पंजाब यांना जोडणारा मार्ग) पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हिंदूंच्या प्रसिद्ध शारदापीठासाठीही ‘कॉरिडोअर’ (मार्ग) बनवावे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंनी केली आहे. यासाठी ते संघटितपणे सरकारवर दबाव आणणार असल्याचे सांगण्यात आले
१. या मागणीसाठी काश्मिरी हिंदूंनी ‘शारदापीठ बचाव समिती’ची स्थापना केली आहे.
२. या मागणीला साधू-संतांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काश्मिरी हिंदूंनी कुंभक्षेत्री याविषयी विशेष प्रदर्शनही लावले आहे. यामध्ये शारदापीठाशी संबंधित प्राचीन इतिहासाची माहिती देण्यात आली आहे.
३. ६ फेब्रुवारीला प्रयागराज येथे साधू-संतांच्या उपस्थितीत शारदापीठाविषयी दिशा ठरवण्यासाठी ‘संत संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुरी, कांची, बद्री, द्वारका, गोकर्ण आणि शृंगेरी या पीठांच्या शंकराचार्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच दिवशी शारदापीठ उघडण्यासाठीचा प्रस्तावही संमत करण्यात येणार आहे.
४. प्रयागराज येथे ८ फेबु्रवारीला ‘शारदा कुंभ स्नान’ आयोजित करण्यात आले आहे.
५. ‘शारदापीठ बचाव समिती’चे पदाधिकारी रवींद्र पंडित म्हणाले, ‘‘कुंभमेळ्यात प्रथमच शारदापीठावर आधारित प्रदर्शन लावण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हिंदूंच्या या प्राचीन मंदिरात जाण्याची त्यांना अनुमती नाही. या पीठाचे महत्त्व, त्याची प्राचीनता आदींविषयीची सर्व माहिती आम्ही कुंभमेळ्याच्या माध्यमातून हिंदूंपर्यंत पोहोचवणार आहोत. वर्ष १९४८ मध्ये शारदापीठाच्या गादीवर असलेले अंतिम संत स्वामी नंदलाल यांचा ८ फेबु्रवारी या दिवशी निर्वाण दिवस असतो. त्यानिमित्ताने प्रयागराज कुंभमेळ्यात स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. शारदापीठ खुले करण्यासाठी यापूर्वीच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात