सनातन प्राचीन संस्कृतीतील ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
भोसरी : सनातन संस्कृती ही वेदांमधून निर्माण झाली आहे. सध्याच्या मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेमध्ये सनातन संस्कृतीचा अभ्यास करण्याची सोय नसल्याने भारतियांच्या गौरवशाली इतिहासाविषयी लोक अनभिज्ञ आहेत. शून्याचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध, कालमापन पद्धत, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, स्थापत्यशास्त्र, संगीत आदी विद्यांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती श्रेष्ठ होती. या गोष्टींचे ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
‘मिशन इको-भारत’च्या अंतर्गत महामही तेजस्वन श्री श्री श्री एम्केसी रुद्रगुप्तपदाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते २३ जानेवारी या कालावधीत पांजरपोळ ट्रस्टच्या गोशाळेतील मैदानावर ‘भारत गौरव मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ जानेवारी या दिवशी दुपारच्या सत्रात ते बोलत होते. प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था, गौरवशाली इतिहास, वेदविद्येचे प्रकार यांविषयी श्री. रमेश शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अशोक देशमुख यांनी केले. तीन दिवसीय कार्यक्रमात ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विषयाच्या विविध पैलूंवर व्याख्यानांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.