चंदिगड : हरियाणाच्या हाँसी गावामधील धर्मप्रेमी हिंदूंसाठी २० जानेवारी २०१९ या दिवशी भ्रमणभाषच्या माध्यमातून ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गाला प्रारंभ करण्यात आला. बजरंग दलाचे हाँसी जिल्हा संयोजक श्री. किशन गुज्जर यांनी हा धर्मशिक्षणवर्ग आयोजित केला होता. हिंदु जनजागृती समितीचे यमुनानगर जिल्हा समन्वयक डॉ. भूपेश शर्मा यांनी ‘हिंदु तरुणांना हिंदु धर्माची महानता लक्षात यावी, तसेच ‘जीवनात येणार्या समस्यांच्या मागे आध्यात्मिक कारणे असतात’, हे लक्षात यावे, यासाठी त्यांनी उदाहरणांसह विषय मांडला, तसेच ‘आपल्या समस्यांच्या निवारणासाठी कालानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे’, याविषयीचे शास्त्र त्यांनी विशद केले. जिज्ञासूंनी प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. किशन गुज्जर यांनी या वेळी सांगितले की, धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच काही हिंदू त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने अन्य पंथियांकडून अयोग्य विधी करून घेतात.
क्षणचित्रे
१. बजरंग दलाचे श्री. किशन गुज्जर यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि कार्यपद्धती पाहून असे वाटले की, त्यांच्या समवेत कार्य करणार्या कार्यकर्त्यांमध्ये धर्मज्ञान आणि आध्यात्मिक बळ निर्माण झाल्यास ते धर्मरक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतात.
२. बजरंग दलाचे हाँसी नगर संयोजक श्री. भूपेंद्र राठोड यांनी धर्मशिक्षणवर्गानंतर डॉ. भूपेश शर्मा यांना संदेश पाठवून धर्मकार्य करण्यासाठी त्यांच्या संपर्कात रहाणार असल्याचे सांगितले.