हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वच्छ कुंभ सात्त्विक कुंभ’ उपक्रम !
प्रयागराज (कुंभनगरी) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वच्छ कुंभ सात्त्विक कुंभ’च्या मोहिमेअंतर्गत प्रयागराज येथील प्रसिद्ध लेटे हनुमान उपाख्य बडे हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी १ सहस्राहून अधिक ‘सनातनची ग्रंथ प्रदर्शन मोहीम’ आणि ‘मंदिर स्वच्छता’ यांविषयीच्या हस्तपत्रकांचे वाटप करण्यात आले. याला भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मंदिर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.
याविषयी माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, ‘‘हा कुंभमेळा ‘स्वच्छ कुंभ आणि दिव्य कुंभ’ खर्या अर्थाने करायचा असेल, तर ‘सात्त्विक कुंभ आणि स्वच्छ कुंभ’ ही मोहीम राबवली पाहिजे. यानंतर लोकांचे आचरण शुद्ध आणि सात्त्विक होईल. त्याच वेळी खर्या अर्थाने स्वच्छता राखली जाईल. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वच्छ कुंभ सात्त्विक कुंभ’ हे अभियान संपूर्ण कुंभमेळ्यात राबवण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मंदिरात हस्तपत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे.’’