डोंबिवली येथे २ जणांवर गुन्हा नोंद !
मुंबई, ठाणे आणि रायगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहिमेचे यश ! राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कारवाई करणार्या पोलिसांनी ही कारवाई स्वतःहून करणे अपेक्षित होते ! यावरून पोलिसांमध्ये राष्ट्रप्रेम जागृती होणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !
मुंबई : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे चित्र असणारे ‘टी शर्ट’ विकणार्या विक्रेत्यांच्या विरोधात मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे आदी ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्या. या प्रकरणी डोंबिवली येथे २ जणांवर गुन्हा नोंद झाला, तसेच मुंबई, रायगड या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीवर कार्यवाही करत पोलिसांनी दुकानदार आणि अन्य छोटे विक्रेते यांना राष्ट्रध्वजाप्रमाणे दिसणारे ‘टी शर्ट’ विक्री करण्यापासून रोखले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाणे, मुंबईमध्ये भोईवाडा पोलीस ठाणे, पालघर जिल्ह्यातील विरार (पू.) पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे नेरूळ पोलीस ठाणे येथेही हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची तात्काळ नोंद घेत पोलिसांनी जुने पनवेल येथील शिवाजी चौक येथील फेरीवाले आणि दुकानदार यांना अशा प्रकारचे ‘टी शर्ट’ न विकण्याची ताकीद दिल्यावर त्यांनी दुकानातून हा माल काढला. मुंबई येथे भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या भागातील दुकानांतील ‘टी शर्ट’ विक्रीतून काढून टाकण्याची सूचना पोलिसांनी दिली.
नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करतांना भाजप युवा मोर्च्याचे सरचिटणीस श्री. गुलाब नाविक, योग वेदांत सेवा समितीचे श्री. रमेश सिद्धपुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवि पाटील, तसेच श्री. निशांत चौधरी हे राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.