मुंबई : २६ जानेवारी या दिवशी प्लास्टिकचे ध्वज, ध्वजाच्या रंगातील कपडे, केक यांच्या माध्यमातून होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून दहिसर, बोरीवली, मीरारोड आणि अंधेरी, भांडुप, परळ, जोगेश्वरी, गिरगाव, तसेच पालघर जिल्ह्यातील नालासोपारा आदी ठिकाणी प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. ज्या राष्ट्रध्वजासाठी कित्येक स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांनी त्यांच्या प्राणाचे मोल दिले आहे, त्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून क्रांतीकारकांना अभिप्रेत असलेले सुराज्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.
भांडुप येथील बँक ऑफ बडोदा वसाहतीत सत्यनारायण पूजेच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात समितीचे श्री. प्रवीण पाटील यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान’ राखण्यासाठी प्रबोधन केले.
परळ येथे एका दुकानदाराचे समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यावर त्याने विक्रीसाठी ठेवलेले झेंड्याच्या रंगाचे ‘टी शर्ट’ काढून ठेवले. एके ठिकाणी प्लास्टिकचे झेंडेे विकणार्या विक्रेत्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी २ ठिकाणी झेंड्यांची विक्री थांबवली.
नालासोपारा (पालघर) येथील भंडार आळी आणि साई जीवदानी कॉम्प्लेक्स या २ ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थितांना ध्वजाविषयी माहिती सांगून ‘सध्या आपल्या देशाची झालेली अराजकसदृश स्थिती, तथाकथित धर्मनिरपेक्षताच्या नावाखाली चालू असलेला हिंदूंचा छळ आणि त्यावर उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण
नालासोपारा येथील कार्यक्रमात कु. जश राऊत, कु. गौरव राऊत या लहान मुलांनी संपूर्ण ‘वन्देमातरम्’ म्हटले.
प्रतिक्रिया
समितीने मांडलेला विषय आवडला. आज प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी राष्ट्राविषयी जागृती केली, ते चांगले झाले. – आत्मारामनगर को-ऑप. हौ. सोसायटी, मीरारोड येथील रहिवासी
यवतमाळ
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी स्थानिक एल्आयसी चौक येथे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये खराब झालेले, खाली पडलेले, तसेच वाहनाला लावलेले ध्वज ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये’ जमा करण्यात आले. नागरिकांना क्रांतीकारकांनी केलेल्या बलीदानाची आठवण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागृत असावे, यासाठी क्रांतीकारकांची माहिती सांगणारे सचित्र फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला काही माजी सैनिकांनीही भेट दिली. प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासू नागरिक, शाळकरी मुले यांनी घेतला.
या वेळी माजी सैनिकांनी प्रदर्शनाविषयी पुढील गौरवोद्गार काढले.
१. भारताच्या खर्या स्वातंत्र्यसैनिकांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या दृष्टीने खरोखरच चांगला प्रयत्न आहे. हे बघून अतिशय चांगले वाटले आणि प्रेरित झालो. – श्री. नितीन लाखाणी, माजी सैनिक
२. या स्वातंत्र्यसैनिकांची विद्यार्थ्यांना आठवण करून दिल्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे आभार ! – श्री. संतोष हुडेकर, माजी सैनिक
३. भारतीय स्वातंत्र्यसमरात आहुती देणार्या क्रांतीकारकांची माहिती नवीन पिढीला अवगत करून दिल्याविषयी अभिनंदन ! या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन ! भारत माता की जय ! – श्री. दिलीप राखे आणि श्री. प्रदीप शेंडे, माजी सैनिक
या मोहिमेमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य मित्र मंडळ, यवतमाळ यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिक आणि कागद यांचे गोळा केलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले.
क्षणचित्रे
१. स्वराज्य मित्र मंडळ, यवतमाळ येथील १० ते १२ कार्यकर्ते भगवे कपडे घालून या सेवेमध्ये सहभागी झाले.
२. प्रबोधन केल्यावर काही युवकांनी चेहर्यावर रंगवलेले राष्ट्रध्वज पुसलेे.
३. काही संघटनांनी दुचाकी वाहनांची फेरी काढली; परंतु त्यामध्ये चित्रपटांतील अश्लील गाणी लावली होती. (अशा नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान कधीतरी निर्माण होईल का ? – संपादक)