बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेला १० सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
बेळगाव : आज गोहत्या, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांनी भयावह स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते. अशा वेळी हिंदूंनी जात-पात, पक्ष, संप्रदाय, सीमावाद अशा संकुचित गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, असे जाज्वल्य प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रविवार, १३ मार्च या दिवशी येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक
आणि हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले.
श्रीराम सेना, हिंदु एकता आंदोलन, हिंदु राष्ट्र सेना यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आणि मंडळे यांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अन् धर्माभिमानी, तसेच शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांचे कार्यकर्ते अशा १० सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंनी सभेला उपस्थित राहून राष्ट्र आणि धर्म यांप्रतीचे कर्तव्य बजावले.
सभेच्या आरंभी श्री. टी. राजासिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी केले, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा श्री. राजेंद्र पाटील यांनी मांडला.
श्री. राजासिंह म्हणाले….
१. अन्य धर्मियांना तुम्ही कोण आहात, असे विचाल्यावर ते त्यांच्या जातीचा उल्लेख न करता प्रथम मुसलमान, ख्रिस्ती असे सांगतात. त्याचप्रमाणे हिंदूंनीही अन्य कशाचाही उल्लेख न करता प्रथम मी हिंदु आहे, असे अभिमानाने सांगावे.
२. हिंदूंनी आजपासून मी कोणतीही वस्तू केवळ हिंदूंकडूनच खरेदी करीन. वस्तू खरेदी करतांना दोन रुपये अधिकचे गेले, तरी चालतील; पण अहिंदूंकडून मी एकही वस्तू खरेदी करणार नाही, असा निश्चय करा.
३. हिंदुत्वाचे कार्य करतांना युवकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हिंदुत्वाचे कार्य करतांना प्रसंगी कारागृहातही जाण्याची सिद्धता तरुणांनी ठेवली पाहिजे. माझ्यावर १५० हून अधिक खटले दाखल आहेत. जो धर्मकार्य करतो, त्याचे ईश्वर रक्षण करतो, हे माझे जिवंत उदाहरण आहे. बर्याच वेळा मला मारण्याचा प्रयत्न केला; पण मी ईश्वरी कार्य करत असल्याने आज तुमच्यासमोर उभा आहे.
४. आज लाखोंच्या संख्येने रामभक्त भाग्यनगर येथे शोभायात्रा काढतात. ही शोभायात्रा काढतांना अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे झाकून ठेवावी लागतात. यावरून संघटनेत किती शक्ती आहे, हे लक्षात येते. असे सर्वत्र व्हायला पाहिजे.
५. आज हिंदु संत भयाच्या वातावरणात रहात आहेत आणि राज्यकर्ते मात्र वातानुकूलित गाडीतून फिरत आहे. हे अयोग्य आहे.
जिहादी आतंकवाद्यांइतकाच पुरागाम्यांचा या राष्ट्राला मोठा धोका ! – अभय वर्तक, सनातन संस्था
या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले, सध्या जगासमोर आतंकवाद ही मोठी समस्या आहे. भारतात जिहादी आतंकवादासमवेत पुरोगाम्यांच्या आतंकवादासही तोंड द्यावे लागत आहे.
हे पुरोगामी वारंवार हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करत आहेत. हिंदूंच्या देवता आणि संत यांची अपकीर्ती करत आहेत. अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांना नावे ठेवणारे, हिंदु धर्माला अडगळ म्हणणारे तथाकथित साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना देशातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणारा भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचे अनैतिक संबंध होते, असे म्हणणारे डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मीप्रसाद यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हे ऐकून ज्या हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकात जात नाही, त्यांना हिंदु म्हणायचे का ? अशा प्रकारची विटंबना कधी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांची झाली असती का ? आणि अशी विटंबना केल्यावर त्यांना पुरस्कार मिळाले असते का ? हे पुरोगामी हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धीभेद निर्माण करत आहेत. त्यामुळे जिहादी आतंकवाद्यांइतकाच पुरोगाम्यांचाही या राष्ट्राला धोका आहे.
श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले…
१. जेएनयू ची स्थिती जिहादी निर्माण करणार्या विद्यापिठासारखी झाली आहे. देशभरातील पुरोगामी जेएनयूतील वैचारिक जिहादचे समर्थन करत आहेत. पुरोगाम्यांना भारताची बर्बादी हवी आहे. आपल्याला भारताचे रक्षण करायचे असल्याने या देशद्रोही पुरोगाम्यांच्या विरुद्ध सडेतोड उत्तर द्यावे लागेल.
२. आपला जन्म वीतभर पोट भरण्यासाठी नाही. तुम्ही देवाचे व्हा, देव तुमचा होईल.
३. माध्यमांमध्ये हिंदुविरोधी सुपारी घेणार्या पत्रकारांचा सुळसुळाट आहे. मुंबई मिररच्या अलका धुपकर असो कि धर्मेंद्र तिवारी असोत, त्यांना सत्याधिष्ठित पत्रकारिता करायची नाही. त्यांना केवळ मोठ्या मोठ्या दैनिकात खोट्या खोट्या बातम्या छापून हिंदूंची आणि हिंदु संघटनांची अपकीर्ती करायची आहे. अपकीर्ती करण्यासाठी पुरोगाम्यांकडून सुपारी घेण्यासाठी ही मंडळी मागेपुढे पहात नाहीत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या खोट्या अहवालाचा दाखला देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडी खोटी विधाने घालण्याचा खोटारडेपणा या पत्रकारद्वयींनी केला. पत्रकारितेतील हा भ्रष्टाचार कोण रोखणार ? अशा सुपारीबाज पत्रकारांमुळेच वृत्तपत्रांच्या कार्यालयावर हिंदूंना मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.
आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणार्यांना त्याच भाषेत उत्तर द्या ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले, याकुब मेमन या आतंकवाद्याला फासावर लटकवल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला १५ सहस्र लोकांची गर्दी हे आतंकवादाचे उदात्तीकरण नव्हे का ? देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील काश्मिरी मुसलमान आणि साम्यवादी विद्यार्थी यांनी महंमद अफझलचा फाशीदिन साजरा केला. त्याचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तुम कितने अफझल मारोगे, घर घर से अफझल निकलेगा, अशा घोषणा देण्यात आल्या. देशाचे तुकडे करण्याच्या, देशाला उद्ध्वस्त (बरबाद) करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. या धर्मांधांना आणि साम्यवाद्यांना आता ठणकावून सांगितले पाहिजे, अगर घर घर से अफलझ निकलेगा, तो उसे घर घर मे घुसके मारनेवाले छत्रपती शिवाजी महाराज पैदा होंगे । राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार नुकतेच म्हणाले, देशाला हिंदु राष्ट्र बनवणे चिंताजनक आहे. पवार यांच्यासारख्या हिंदु राष्ट्राच्या विरोधकांना हे ठाऊक नाही की, हिंदु राष्ट्राला विरोध म्हणजे इस्लामिक स्टेटला पाठिंबा होय !
श्री. मनोज खाडये म्हणाले….
१. इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटचा प्रभाव देशात सर्वत्र वाढत आहे. इसिसच्या भारतप्रवेशामुळे इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी भारतीय पोलीस आणि सैन्य यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. प्रत्येक भारतियाने इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढण्यासाठी १४ हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन सिद्ध झालेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या चळवळीत सहभागी झाले पाहिजे.
२. काँग्रेसवाले म्हणतात, दुष्काळाच्या निवारणासाठी मंदिरांचा पैसा घ्या. त्याऐवजी या काँग्रेसी नेत्यांची संपत्ती का घेऊ नये ? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ७० लक्ष रुपयांचे घड्याळ घातले होते. यावरून काँग्रेसी राज्यकर्त्यांची मनोवृत्ती लक्षात येते.
३. बेळगाव येथे मुसलमानांनी मोर्चा काढला, तेव्हा मंदिर वही बनायेंगे या घोषणेवर बंदी घालण्याची मागणी केली. आता श्रीराम मंदिर बांधूनच पूर्ण होणार असल्याने ही घोषणा आपोआपच मान्य होणार आहे.
४. आज आपण केवळ साधू-संत यांच्या कृपेने जिवंत आहोत. साधू-संतांना गंगा नदीत फेकून द्या, असे म्हणणारे बिहारचे खासदार पप्पू यादव यांनाच साधू-संतांचे भक्त अरबी समुद्रात बुडवतील.
५. एकीकडे संरक्षणमंत्र्यांनी आर्थिक बोजा होतो; म्हणून सैन्यघट करण्याचे घोषित केले आहे. दुसरीकडे आमदार-खासदार यांचे भत्ते मात्र अल्प केले जात नाहीत आणि पाक क्रिकेटपटूंच्या संरक्षणासाठी व्यय करण्यात येत आहे.
६. ज्याप्रमाणे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नेपाळवरून येतांना अचानक पाकिस्तानला भेट दिली. त्याप्रमाणे भारतीय सैन्यालाही अचानक पाकिस्तानला भेट देण्यास सांगावे म्हणजे सर्व समस्यांचे निराकरण होईल.
७. अश्लील चित्रफीती पहाण्याऐवजी वीरश्री निर्माण करणार्या चित्रफीती पहा.
सभेला बहुसंख्य पोलिसांची उपस्थिती !
सभेला पुष्कळ मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. पोलीस गटागटाने धर्माभिमान्यांचे निरीक्षण करत होते, तसेच येणार्या हिंदु धर्माभिमान्यांची छायाचित्रे काढत होते आणि ध्वनीचित्रीकरणही करत होते. पोलीस वक्ते, वक्त्यांचे सन्मान या प्रत्येकाची छायाचित्रे काढत होते. जवळपास संपूर्ण मैदान पोलिसांनी व्यापले होते. (पोलिसांनी हाच वेळ जिहादी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
श्री. मनोज खाडये पोलिसांना उद्देशून त्यांच्या भाषणात म्हणाले, पोलीस ज्याप्रकारे हिंदु धर्माभिमान्यांचे चित्रीकरण करत आहेत, तसेच त्यांनी जरा मागे वळून या सभेसाठी किती धर्माभिमानी हिंदू उपस्थित आहेत, ते पहावे. पोलीस नेहमी हिंदूंच्या मागे लागतात; मात्र या देशात पोलिसांचे मनोबल जर कोण वाढवत असेल, तर ते हिंदूच आहेत. त्यामुळे पोलिसांनी हिंदूंशी सौहार्दाने वागले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात