राममंदिर उभारण्याची मागणी !
पनवेल : शासनाने अध्यादेश काढून लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करावी, यासाठी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रामभक्त यांनी रामाचा नामजप करीत अन् घोषणा देत २८ जानेवारी या दिवशी येथे आंदोलन केले. या आंदोलनात ५० हून अधिक रामभक्त आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. अनेक धर्मप्रेमी स्वतःहून येऊन उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करीत होते आणि ‘राममंदिर व्हायलाच हवे’, असे सांगत होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर या वेळी म्हणाले की, जर काँग्रेसच्या कार्यकाळात श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकतो, तर विकास आणि हिंदुत्व या सूत्रांवर निवडून येणार्या भाजपला राममंदिर उभारणे निश्चितच शक्य आहे. भाजप शासनाने अॅट्रॉसिटीच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश संसदेत कायदा करून पालटला, तसेच तीन तलाकच्या संदर्भात अध्यादेश काढून कायदा केला. इतके सगळे होऊ शकते, तर ज्यासाठी हिंदूंनी निवडून दिले, ते शासन राममंदिरासाठी आध्यादेश का काढत नाही ?
या वेळी उपस्थितांनी व्यक्त केलेले मनोगत
१. कु. शैलजा मिसाळ, रामभक्त – आज आमचा राम तंबूत आहे, हे आम्ही कदापी सहन करणार नाही. राममंदिर बांधणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
२. श्रीमती प्रभावती उपाध्ये, रामभक्त – शासन आम्हा हिंदूंच्या भावनांची कदर करीत नाही. आमच्या शरिरात प्राण असेपर्यंत आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सातत्याने संघर्ष करू आणि राममंदिर उभारू.
३. श्री. रोहिदास शेडगे, धर्मप्रेमी – शासनाची राममंदिर बांधण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता आम्हा हिंदु बांधवांनाच संघटित होऊन राममंदिर बांधावे लागेल.
विशेष
१. लोक श्रीरामाच्या प्रतिमेला भावपूर्ण नमस्कार करत होते.
२. रस्त्यावरून जाणारे पुरुष आणि महिलाही हात उंचावून घोषणा देत होत्या.
३. रस्त्यावरून जाणारे ३ धर्मप्रेमी या आंदोलनात सहभागी होऊन शेवटपर्यंत थांबले.
प्रतिक्रिया
१. मला राममंदिर उभारण्यासाठीच्या आंदोलनाला कुठेही बोलवा, मी येईन ! – रामनिवास
२. आम्हाला या आंदोलनात सहभागी होण्याची आतूनच स्फूर्ती मिळाली; म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो ! – सर्वश्री बाळू वाघ, अरुण कांबळे