कुंभमेळा २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) : कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील महंतांनी ३० जानेवारीला काली मार्गावर निदर्शने केली. या वेळी त्यांनी कुंभमेळा अधिकार्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. उत्तरप्रदेशमधील आनंदेश्वर महादेव मठ परमट घाट कानपूरचे अनंत श्री विभूषित जगद्गुरु पंचानंद गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनातील महंतांनी प्रशासनाच्या विरोधतात घोषणा दिल्या. या आंदोलनात महंत चेतनागिरी महाराज, महंत बालकानंदगिरी महाराज, महंत जयंत महाराज आदी महंत सहभागी झाले होते.
कुंभमेळ्याच्या कामकाजात प्रचंड भ्रष्टाचार ! – अनंत श्री विभूषित जगद्गुरु पंचानंद गिरी महाराज
दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना अनंत श्री विभूषित जगद्गुरु पंचानंद गिरी महाराज म्हणाले, ‘‘कुंभमेळ्याच्या कामकाजात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराने प्रशासकीय अधिकार्यांचे पोट भरले आहे. संत आणि महंत यांना त्रास दिला जात असतांना प्रशासकीय अधिकारी तोंड वर करून ‘कुंभमेळा अतिशय चांगला आहे’, असे जनतेला सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या डोळ्यांनी कुंभमेळ्यातील असुविधा पहाव्यात. शौचालयांची सुविधा नसल्याने संत आणि महंत अप्रसन्न आहेत. एकीकडे शौचालय दिल्याचे सांगतात आणि दुसरीकडे खुल्या भूमीवर शौचालयाला जायला सांगतात. हा अन्याय आहे.’’
भाजपचे सरकार असतांना साधू आणि संत यांना अडचण का ? – श्री महंत स्वामी श्री हरिहरानंद भारती महाराज
उत्तरप्रदेशमधील भवनाथ जुनागढ येथील श्री भारती आश्रमाचे श्री महंत स्वामी श्री हरिहरानंद भारती महाराज म्हणाले, ‘‘कुंभमेळा अधिकारी काहीही करत नाहीत, उलट तेच आमच्याकडून वीज आणि आखाडा बांधल्याचे देयक मागत आहेत. कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही. ४० सहस्र रुपयांचा एकेक तंबू असून त्यामध्ये संत मुक्कामी आहेत. आता अधिकारी पैसे मागत असतांना आम्ही पैसे कुठून आणणार ? हे अधिकारी म्हणतात की, तुमच्या पैशांनी सुविधा घ्या. कुंभमेळ्यात साधूंना त्रिवेणी संगमावर जातांना पोलीस अडवतात. भाजपचे सरकार सत्तेवर असतांनाही आम्हाला अडचण का येत आहे ? सरकार कोणाचेही असू दे, हा साधूंचा कुंभमेळा आहे. साधूंसमवेत भाविकांनाही प्रशासनाचा त्रास होत असल्याविषयी आम्ही त्याचा निषेध करतो.’’