मंगळूरू (कर्नाटक) : भारतात हिंदूंच्या धार्मिक भावनांना किंमत नाही, असे प्रतिपादन कर्नाटकातील करिंजे येथील श्री श्री मुक्तानंद स्वामी यांनी येथे हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये नुकतेच केले. या वेळी बेंगळूरू उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश् एन्.पी., हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनीही मार्गदर्शन केले. मंगळूरू दक्षिण भागाचे भाजपचे आमदार श्री. वेदव्यास कामत या सभेला उपस्थित होते.
श्री श्री मुक्तानंद स्वामी पुढे म्हणाले की, आपली न्याययंत्रणा याकूब मेननला फाशी होऊ नये, यासाठी रात्री १ वाजता उघडून न्यायदान करते; परंतु हिंदूंच्या विषयावर त्यांना वेळ नाही, असे म्हणते. इतकेच नाही, तर न्यायालयांनी धर्मपरंपरांच्या विरोधात निर्णय देणे आरंभले आहे. न्यायालयाने शबरीमला आणि शनिशिंगणापूर मंदिरांतील शेकडो वर्षांपासूनच्या परंपरांच्या विरोधात निर्णय दिले. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना किंमत नाही, असेच म्हणता येईल.
मंगळूरू सभेला पोलीस, महानगरपालिका आणि हिंदुविरोधी संघटना यांच्याकडून झालेला विरोध
हिंदूंनो, कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या राज्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभेला होणारा हा विरोध पहाता असे विरोध वैध मार्गाने मोडून काढूनच सभाच नव्हे, तर पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे, हे लक्षात घ्या !
प्रथम मंगळूरू केंद्र मैदानात सभा घेण्यास ठरले होते. त्याविषयी येथील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतून प्रचार करण्यात आला. ‘या मैदानावर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार आहे’, असे खोटे सांगत महानगरपालिकेने मैदानाची अनुमती देण्यास नकार दिला. नंतर येथील कद्री मैदानात सभा घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सभेला १ आठवडा असतांना पोलिसांनी अनुमतीसाठी १ आठवडा लागेल आणि २० सहस्र रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे शारदा विद्यालयातील सभागृहात सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी ५० फलक आणि ३०० भित्तीपत्रके शहरात लावून प्रसार करण्यात आला. त्यानंतर हिंदुविरोधी संघटनांनी या सभेला विरोध करण्यास चालू केले. त्यामुळे सभेचा प्रचार करण्यास अडचणी येऊ लागल्या. पोलिसांकडून ध्वनीक्षेपकावरून प्रसार करण्याची अनुमतीही देण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला; मात्र ‘विरोधामुळे आम्हाला अडचणी येऊ शकतात’, असे सांगत या सभागृहात सभा घेण्यास शाळेच्या व्यवस्थापनाने अनुमती नाकारली. तेव्हा सभेला केवळ २ दिवस शिल्लक होते. दुसरे सभागृह मिळेपर्यंत सर्व साधकांनी शरणागतीने प्रार्थना करणे, मंडल घालणे, प्रार्थना करणे, नामजप करणे यांत वाढ केली. नंतर गुरुकृपेने श्रीनिवास कल्याण मंडपात विनामूल्य जागा मिळाली. सभेला १ दिवस राहिला होता, तेव्हा साधकांनी पूर्वी संपर्क केलेल्या लोकांना, संघटनांना दूरभाष करून सभेचे ठिकाण पालटल्याचे कळवले. तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करण्यात आला. पूर्वी ठरवण्यात आलेल्या सभांच्या ठिकाणी सभेचे स्थान पालटल्याचे फलक लावण्यात आले. इतके होऊनही ४८५ धर्माभिमानी सभेला उपस्थित होते, तर सभेनंतरच्या संवाद कार्यक्रमात ६० धर्मप्रेमी उपस्थित होते.