हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
चिपळूण
भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीतील पैसा संपल्याने आता हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन त्यातील देवनिधीचा वापर करण्याचे कारस्थान चालू आहे. हिंदुत्वनिष्ठांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांचा नाहक छळ केला जात आहे. यासमवेत शिक्षण, आरोग्य, पोलीस प्रशासन याविषयीही लोकशाहीचा निरर्थकपणा दिसून येतो. सध्या शिक्षणक्षेत्रात आधी ‘डोनेशन’ आणि मग ‘अॅडमिशन’ अशी स्थिती आहे. वैद्यकीय क्षेत्रात नैसर्गिक प्रसुतीपेक्षा ‘सिझेरियन’ केले जाते, तसेच देशाच्या राज्यघटनेत बहुमताला स्थान असले, तरी बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे. अल्पसंख्यांक कितीही दंगल, गोहत्या केली, तरी त्यातील अन्यायग्रस्त हिंदूंवरच कारवाई करून धर्मनिरपेक्षता पाळली जाते. या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हिंदूंना आवश्यक असलेले साहाय्य अधिवक्त्यांनी करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील खारीचा वाटा उचलण्यासाठी अधिवक्त्यांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.
चिपळूण येथे शनिवार, २६ जानेवारी या दिवशी चतुरंग प्रतिष्ठानच्या सभागृहात दु. ३.३० ते ६.३० या वेळेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अधिवक्ता मिलिंद तांबे, अधिवक्ता शाम नार्वेकर, अधिवक्ता विजय चिमणे, अधिवक्ता सौ. वासंती दाभोळे, अधिवक्ता सौ. पल्लवी भावे, अधिवक्ता स्नेहल पाटील आणि अधिवक्ता प्रभुदेसाई उपस्थित होते.
या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, अधिवक्त्या (सौ.) मेघना नलावडे, अधिवक्त्या (सौ.) श्रेया कदम, सौ. अस्मिता सोवनी आणि पंढरपूर येथील अधिवक्ता अभय कुलकर्णी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. विनायक जगताप यांनी केले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यासंबंधीचा ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली.
१. अधिवक्ता मिलिंद तांबे, चिपळूण : खरेतर भगवान श्रीकृष्ण हा प्रथम अधिवक्ता आहे. हस्तिनापुरात कौरवसभेत पांडवांची न्याय बाजू त्याने मांडली. माहिती अधिकाराच्या क्षेत्रात कार्य करण्यास आवडेल. आता ‘सिटिझन शिप अॅक्ट’ या कायद्याद्वारे पाकिस्तानी हिंदूंना भारतात आश्रय मिळण्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण कायदा असून याविषयी राज्यकर्ते जनतेचा बुद्धीभेद करत आहेत. त्याकरता आपण लोकांचे प्रबोधन केले पाहिजे.
२. अधिवक्ता विजय चिमणे : न्यायव्यवस्थेतील दुष्प्रवृतींच्या विरोधात संघटित होऊन लढा दिला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःला आपण काहीतरी मोठे आहोत, असे समजणार्या लोकांमुळे त्या त्या क्षेत्रात दुष्प्रवृत्ती वाढत आहे. आपला लढ्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. माझे सहकार्य राहील.
३. अधिवक्ता (सौ.) स्नेहल पाटील : संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे. आज जे मार्गदर्शन झाले, ते पटले आता यापुढे कृतीच्या स्तरावर काय करायचे हे ठरवण्यासाठी कधी एकत्रित यायचे हे ठरवून घेऊया.
४. अधिवक्ता शाम नार्वेकर : हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यात सहभागी होण्यास मनापासून आवडेल.
५. अधिवक्ता (सौ.) पल्लवी भावे : आज न्याय क्षेत्रातील परिस्थिती गंभीर आहे. यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी येथेही अधिवक्ता बैठक श्री. संजय मुळ्ये, शिवाजीनगर यांच्या घरी झाली. या बैठकीमध्ये अधिवक्ता या नीलेश सांगोलकर यांनी न्यायालयीन व्यवस्थेविषयी सांगून अधिवक्ते या माध्यमातून धर्मकार्य कसे करू शकतात याविषयी सांगितले. त्यानंतर उपस्थित अधिवक्त्यांनी न्यायालयीन साहाय्य हवे असल्यास ते करण्याची सिद्धता दर्शविली. या वेळी अधिवक्ता मोहन आठवले, अधिवक्त्या (सौ.) कल्पलता भिडे, अधिवक्ता सुनील मेस्त्री, अधिवक्ता अमित काटे, सिंधुदुर्ग येथील अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, अधिवक्त्या स्मिता देसाई, अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी आणि पंढरपूर येथील अधिवक्ता अभय कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद म्हैसकर यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची माहिती दिली.