हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक
प्रयागराज : विहिंप आयोजित धर्मसंसदेने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प न करता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राममंदिराच्या आंदोलनालाच स्थगिती देणे, हा निर्णय दुर्दैवी आणि हिंदु समाजाच्या श्रद्धेचा अवमान करणारा आहे. आज राममंदिर उभारणीसाठी समस्त भारतवर्षाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. समस्त हिंदु समाज धर्मसंसदेत एकजूट झालेल्या संतांच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा ऐकण्यास आतूर होता; पण केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाला पुन्हा सत्ताप्राप्तीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत,यासाठी या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. असे करून एकप्रकारे विहिंपने स्वतःला राजकीय पक्षाचा समर्थक म्हणून सिद्ध केले आहे.विहिंपसाठी कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन न करता राममंदिर उभारणीचे अंतिम ध्येय हिंदु समाजासमोर ठेवण्याची एक संधी होती. मात्र विहिंप स्वतःची अराजकीय प्रतिमा निर्माण करण्यात अपयशी ठरली.
वस्तुतः तीन तलाक आणि जीएसटीचा वटहुकूम काढणार्या भाजप सरकारने राममंदिर उभारणीसाठीचा वटहुकूम काढावा, अशी मागणी विहिंपने धर्मसंसदेत करणे अपेक्षित होते; पण या धर्मसंसदेने समस्त हिंदु समाजाला निराश केले आहे. गेल्या 71 वर्षांत कुठल्याही पक्षाचे सरकार राममंदिर निर्माण करू शकले नाही किंवा गेल्या 5 वर्षांत त्या विषयी कोणतीही निर्णायक भूमिका मांडू शकले नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता प्राप्त झाल्यावर राममंदिर उभारले जाईल, असा विचार करणे हास्यास्पद आहे. अजूनही वेळ वाया न घालवता अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट प्रस्तूत करणार्या सरकारकडे मागणी करायला हवी की, सरकारने 100कोटींहून अधिक हिंदूंच्या भावनांचा आदर करून राममंदिर उभारणीची तिथी घोषित करावी. जर ही घोषणा झाली, तर समस्त हिंदु समाज या रामकार्यात सक्रीय होईल.
सर्वोच्च न्यायालय या विषयीची प्रक्रिया पूर्ण करेल, हा विहिंपने राममंदिर प्रस्तावात दाखवलेला विश्वास योग्य आहे; मात्र जर न्यायालयावर विश्वास होता, तर न्यायालयाचे न ऐकता वर्ष 1992 मध्ये बाबरी मशीद तोडण्याचे आंदोलन का केले ?, याचे उत्तरही विहिंपने हिंदु समाजाला देण्याची आवश्यकता आहे. ‘हम मंदिर वही बनाएंगे; लेकिन तारीख नही बताएंगे ।’, ही दिशाहीनता अजून किती दिवस चालणार ? आम्ही श्रद्धाळू हिंदु समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमची भावना विश्वातील सर्वांत मोठ्या हिंदु संघटनेसमोर या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडत आहोत.