कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) : धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘फेसबूक लाईव्ह’च्या कार्यक्रमात बोलत होते. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने कुंभनगरीत विशाल धर्मसंसद आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने राममंदिर या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’ करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही त्यांचे विचार मांडले.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘या धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्माविषयी निर्णय होणे आवश्यक आहे. यात हिंदूंच्या केवळ समस्यांवर नव्हे, तर त्यावरील उपायांवर चर्चा होऊन त्याची कार्यवाही होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांवर दबाव निर्माण केला पाहिजे. ज्याप्रमाणे अल्पसंख्यांकांना संरक्षण दिले, तसे सनातन धर्मालाही संरक्षण मिळावे. हिंदुहिताचे निर्णय घेऊन धर्मसत्तेचा राजसत्तेवर अंकुश असल्याचे दाखवून दिले पाहिजे. राममंदिर बनवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांवर दबाव बनवणे आवश्यक आहे.’’ श्री. चेतन राजहंस यांनी ‘राममंदिर बनण्यास राजकीय इच्छाशक्ती अल्प पडत आहे का ?, धर्मसंसदेकडून हिंदूंची अपेक्षा काय आहे’, या विषयांवर मार्गदर्शन केले.
अनुमाने ४ सहस्र ५०० हून अधिक जणांनी ‘फेसबूक लाईव्ह’ या कार्यक्रमाचा लाभ घेतला, तर ८५ हून अधिक जणांनी आपले अभिप्राय व्यक्त केले आणि १३१ जणांनी इतरांनाही पाठवले.