देशभरातील अनेक राज्यांमध्ये काश्मीरसारखीच स्थिती झाली आहे ! – सुनील हंडू, काश्मिरी हिंदु
बेंगळूरू : १९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे सर्वस्व हरवून बसले होते. या काळ्याकुट्ट ऐतिहासिक घटनेला २९ वर्षे पूर्ण झाली, तरी अजून काश्मीरमधील विस्थापित हिंदूंना न्याय मिळालेला नाही. सध्या काश्मीरसारखीच स्थिती देशभरातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन काश्मिरी हिंदु समाजाचे नेते श्री. सुनील हंडू यांनी येथे केले. ते काश्मिरी हिंदू विस्थापितदिनी येळहंका (बेंगळूरू) येथील श्री गायत्री गणपति मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. या वेळी रामकृष्ण विवेकानंद वेदांता आश्रमाचे स्वामी अभ्यानंद महाराज, सनातन संस्थेच्या प्रा. (सौ.) शारदा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीधर यांनी सभेत मार्गदर्शन केले. या सभेला राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताला परत एकदा विश्वगुरु बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श आचरणात आणा ! – स्वामी अभ्यानंद महाराज
युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श आचरणात आणल्यास भारत परत एकदा विश्वगुरु बनेल. सर्व प्रकारचे मतभेद, जात-धर्म विसरून हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन स्वामी अभ्यानंद महाराज यांनी केले.