हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सत्त्वगुणी उद्योगपती आणि व्यावसायिक यांचे योगदान महत्त्वपूर्ण ! – नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी (गोवा) : उद्योगपतींनी भावनेपोटी कोणाला साहाय्य करण्यापेक्षा सत्पात्रे दान करावे. संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हा धर्मकार्यातील सहभागच असतो. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सत्त्वगुणी उद्योगपती आणि व्यावसायिक यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उद्योगपती साधना शिबिरा’ला आरंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.
शिबिराचा उद्देश सांगतांना श्री. गाडे पुढे म्हणाले, ‘‘धर्मकार्यात अन्य उद्योगपतींना या कार्यात जोडणे, त्यांचे संघटन करणे, हिंदुद्वेष्ट्यांकडून आक्रमण झालेल्या हिंदूंना साहाय्य करणे, पुढे येणार्या आपत्काळात हिंदुत्वनिष्ठांना अन्न, वस्त्र आणि निवास यांची व्यवस्था करून देणे, अशा प्रकारे योगदान दिल्याने उद्योगपतींची समष्टी साधनाच होणार आहे.’’
२ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हे शिबीर होणार आहे. बेंगळूरू येथील उद्योगपती श्री. प्रसाद सक्री आणि श्री. नागेश गाडे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील उद्योगपती सहभागी झाले आहेत. या वेळी अश्विनी कुलकर्णी यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख करून दिली, तर हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी समितीच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.