Menu Close

संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षाला १० लक्ष रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) : माहितीच्या अधिकाराचा अपवापर करून १० लक्ष रुपयांची खंडणी स्वीकारणारे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पथकाने १ फेब्रुवारी या दिवशी अटक केली, तसेच वाळवा येथील त्यांचे साथीदार आणि कथित माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा विश्‍वनाथ जंगम यांनाही ईश्‍वरपूर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

१. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याची निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये झाली. त्या वेळी तुषार ठोंबरे हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर अमोल डफळे हे साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात होते.

२. १० जानेवारी २०१७ या दिवशी वाळवा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा जंगम याने अमोल डफळे यांच्याकडे एक आवेदन प्रविष्ट केले. त्यात ‘निवडणूक उमेदवार अर्जांची प्रसिद्धी नोटीसबोर्डावर का केली नाही ?’ अशी विचारणा केली होती. अमोल डफळे हे ईश्‍वरपूर येथे सहकारी संस्थेत साहाय्यक निबंधक म्हणून काम पहातात. वास्तविक हा अर्ज तुषार ठोंबरे यांच्याकडे करायला हवा होता. त्यानंतर २३ जानेवारी २०१७ या दिवशी राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे अर्ज करून जंगम याने डफळे यांच्या अन्वेषणाची मागणी केली. यावर निवडणूक प्राधिकरणाने ‘अर्जात कसलेही तथ्य नाही’, असे उत्तर दिले.

३. २७ नोव्हेंबर २०१८ मध्ये सुयोग औंधकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे आवेदन करून ‘तुमचा २६ डिसेंबर २०१८ या दिवशी ‘बेशरम अधिकारी’ म्हणून सत्कार करणार आहे’, असे कळवले. यावरही ‘आैंधकर यांच्या तक्रारीत कसलेही तथ्य नाही’, असे आयोगाने कळवले.

४. काही कालावधी गेल्यावर कासेगाव येथे एका कार्यक्रमात डफळे यांची औंधकर यांनी भेट घेतली. ‘तुम्ही पैसे दिले, तर मी आणि जंगम तक्रार मागे घेतो’, असे सांगितले. यानंतर १९ जानेवारीला डफळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून आपला ‘बेशरम अधिकारी’ म्हणून ७ फेब्रुवारीला सत्कार करणार असल्याचे कळवले.

५. २८ जानेवारी या दिवशी डफळे यांनी औंधकर यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी औंधकर यांनी डफळे यांच्याकडे पैसे मागितले. कार्यालयातील कर्मचारी काळेबाग यांच्याकडे एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत रावळ, चौधरी, ठोंबरे, डफळे या अधिकार्‍यांकडून प्रत्येकी अडीच लक्ष याप्रमाणे दहा लक्ष रुपयांची मागणी केली.

६. यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी १ फेब्रुवारी या दिवशी आैंधकर याला पकडण्यासाठी सापळा रचला. सायंकाळी ७ वाजता साहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात औंधकर आणि जंगम यांना पैसे नेण्यासाठी बोलावले. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेडगे आणि मयुरेश श्रीराम यांना पंचांसमक्ष पाठवले. सायंकाळी ७ वाजता सुयोग औंधकर एकटाच पैसे नेण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला खंडणी घेतांना पकडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *