Menu Close

‘गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक !’

डावीकडून सनातन संस्थेचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, गंगा आव्हान आंदोलनाचे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी, गंगा रक्षणाचे कार्य करणारे श्री. पुण्यानंदजी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (कुंभनगरी) : गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत, अशी खंत ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली. धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ‘गंगारक्षण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘गंगारक्षण’ विषयावर कार्य करणारे श्री. पुण्यानंदजी, तसेच सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.

या प्रसंगी ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी म्हणाले, ‘‘गंगाजल इतके पवित्र आहे की, ते कधी प्रदूषित होत नाही. गंगा नदीवर धरणेे बांधल्यामुळे हिमालयातून येणार्‍या गंगेचे पावित्र्य अल्प झाले आहे. आता उर्वरित पाण्यात शहरातील दूषित पाणी सोडून गंगा नदी अधिक दूषित केली जात आहे. गंगा नदी प्रदूषित करून नंतर ती स्वच्छ करण्यापेक्षा या नदीत प्रदूषित पाणी जाणारच नाही, यासाठी सरकारने काही तोडगा काढला पाहिजे. या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर ही नदी प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाईल.’’

गंगा रक्षणासाठी श्री. पुण्यानंदजी हे २४ ऑक्टोबर २०१८ पासून धरणे आंदोलन करत आहेत. गंगा रक्षणाविषयी त्यांनी अनेक सूचना मांडल्या आहेत. या सूचना जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी श्री. चेतन राजहंस म्हणाले की, जनतेमध्ये गंगा रक्षणाविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने कुंभमेळ्यामध्ये ‘गंगारक्षण’ या विषयावर प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन कुंभमेळ्यात गंगारक्षणासाठी ठराव संमत करणार आहे. सनातन संस्थेने ‘देवनदी गंगा की रक्षा करे ’या विषयावर ग्रंथ प्रकाशित केल्याची माहिती श्री. राजहंस यांनी दिली.

गंगा रक्षा फेसबूक लाईव्हला लाईक  ११२, कमेंट  २०, शेअर  १६४ इतके असून ते ७ सहस्र १०० जणांनी पाहिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *