केवळ देवाच्या संकीर्तनाने नाही, तर अधर्माच्या विरोधात लढल्याने समाधान मिळते ! – कोंडवीटी ज्योतिर्मयी, कीर्तनकार, तेलंगण
भाग्यनगर : केवळ नामसंकीर्तन करून मला समाधान मिळत नाहीं, तर मंदिरांमध्ये जो काही दुराचार होत आहे, ते पाहून त्याविरोधात लढल्याने मला समाधान मिळते. या संदर्भात मी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना, तसेच मुख्यमंत्र्यांनाही भेटले, मात्र मला कोणीही साहाय्य केले नाही. त्यामुळे मला तुमच्या समोर येऊन विचार मांडावे लागत आहेत. आपल्या सर्वांना मिळून मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील ही लढाई लढायची आहे. आमच्या मंदिरांतील धन सरकारला घेण्याचा काय अधिकार आहे ?, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आजच्या आंदोलनाप्रमाणे सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्यांत, गावांमध्ये असे आंदोलन केले पाहिजे. मंदिरे पुन्हा आपल्या हातात येईपर्यंत ते चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन तेलंगण येथील कीर्तनकार कोंडवीटी ज्योतिर्मयी यांनी या वेळी केले.
विविध हिंदु संघटनांनी तेलंगण आणि आंध्रप्रदेश सरकारकडून होणार्या मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन चालू केले आहे. याच अनुषंगाने ३ फेब्रुवारी या दिवशी येथील धरणा चौकात सकाळी आंदोलन करण्यात आले. यात तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांतून हिंदु जनजागृती समितीसह २२ संघटनांचे २५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनही केले.
मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढणे, ही आपली साधना ! – जी. सत्यवाणी, संस्थापक, भारतीयम संस्था
प्राचीन काळामध्ये मंदिरांच्या माध्यमातून नृत्य, संगीत, शिल्प आदी कलांचे पोषण होत असे. मंदिरांतून अन्नदानही होत असेे, तसेच धर्मशिक्षणही देण्यात येत होते. निधर्मी भारतात आणि आता सरकारीकरणामुळे ही संस्कृती नष्ट होत आहे. याविरोधात लढणे ही आपली साधना आहे.
आंध्रप्रदेशातील मंदिरांच्या ७० सहस्र एकर भूमीवर अवैध नियंत्रण ! – रंजीत वडियाला
केवळ आंध्रप्रदेशातील मंदिरांची सुमारे ७० सहस्र एकर भूमी अवैधरित्या नियंत्रणात घेण्यात आली आहे. मंदिरात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत सरकार मंदिरे कह्यात घेत आहे; मात्र सरकारच भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेली आहे. अशा स्थितीत सरकारवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा ? प्रत्येक मासाला केवळ दीड ते २ सहस्र रुपयांचे उत्पन्न असणार्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार कसा होऊ शकतो ? तरीही सरकारने अशी मंदिरे कह्यात घेतली आहेत. यावरून हे लक्षात येते की, मंदिरव्यवस्था नष्ट करण्याचाच हा प्रयत्न आहे.
सरकार मंदिरांकडून कर घेते; मात्र चर्च आणि मशीद यांच्याकडून तो घेत नाही ! – चेतन गाडी, तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
प्राचीन काळी मंदिरे शिक्षणाची केंद्रे असायची. आज मात्र निरुद्योगी राजकीय नेत्यांसाठी भ्रष्टाचार करणे, हाच उद्योग बनला असून मंदिरांचे सरकारीकरण करून राजकारणी मंदिरांच्या अर्पणावर डल्ला मारत आहेत. जर भारत धर्मनिरपेक्ष आहे, तर सरकार केवळ हिंदूंची मंदिरेच कह्यात का घेत आहे ?
सरकार देशातील चर्च आणि मशिदी कधी कह्यात घेणार का ? सरकार मंदिरांना एक रुपयाही देत नाही; मात्र सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये अन्य धर्मियांवर उधळत आहे. मंदिरांकडून चालवण्यात येणार्या शिक्षणसंस्थांकडूनही कर घेण्यात येत आहे; मात्र चर्च आणि मशीद यांच्याकडून चालवण्यात येणार्या शिक्षणसंस्थांकडून कर घेत नाही. हा हिंदूंवर अन्याय नाही का ?
क्षणचित्रे
१. रूद्र सेवा समाजाचे श्री. नरसिंह मूर्ती यांनी हे आंदोलन निर्विघ्नरित्या पार पडावे आणि आंदोलनाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी आंदोलनाच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर गणहोम केला आणि त्याची विभूती, तसेच पवित्र दोरा सर्व धर्माभिमान्यांना प्रसाद म्हणून दिला.
२. या आंदोलनाच्या दिवशी सायंकाळी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीने मंदिर सरकारीकरणाच्या संदर्भात चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी हिंदु धर्मांच्या विरोधात नेहमीच गरळओक करणारे साहित्यिक कांचा इलय्या यांनी या वेळी मात्र मंदिरे हिंदूंच्या कह्यात देण्याचे मत मांडले.
३. या आंदोलनाची माहिती मिळताच आंदोलनापूर्वी ‘तेलगु एन्आर्ए’ रेडियोने आंदोलनाविषयी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते.
४. कीर्तनकार कोंडवीटी ज्योतिर्मयी या मार्गदर्शन करत असतांना त्यांना अश्रू येत होते.