कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) : बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’ने २ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरी येथे ‘वर्णाश्रम’ या विषयावर परिसंवाद ठेवला होता. या परिसंवादाची प्रस्तावना शास्त्र धर्म प्रचार सभेचे सदस्य श्रोवन सेन यांनी केली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, चार वर्ण हे विराट पुरुषाच्या अंगाचे चार भाग आहेत. मनुष्याला ईश्वरप्राप्ती करण्यासाठी विविध वर्ण आणि आश्रम यांची सनातन धर्मात व्यवस्था आहे. मनुष्याने ईश्वराशी एकरूप होणे, हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. अध्यात्मात उन्नती केल्यावर मनुष्य वर्णातीत होतो. पूर्वी सत्ययुगात केवळ हंसवर्ण होता. म्हणजे सर्व जण तो ईश्वर ‘मी’ आहे, या सोहम् भावात होते. मनुष्याचे अध:पतन झाल्यानंतर वर्णव्यवस्था आली. अध्यात्म जगणार्यांनी साधना करून पुन्हा वर्णातीत होण्याचे ध्येय साध्य केले पाहिजे. या वेळी शास्त्र धर्म प्रचार सभेचे महासचिव डॉ. शिवनारायण सेन आणि प.पू. श्रीनिवास प्रपन्नाचार्य यांचेही मार्गदर्शन झाले.