कालीमाकी, जोहक/ इराक : हिंसक कारवायांसाठी भावनिक आवाहन करुन अथवा फसवून आणलेल्या तरुणांनी संघटना सोडू नये म्हणून इस्लामिक स्टेट अर्थात आयएस ही दहशतवादी संघटना सेक्स गुलामगिरी राबवत आहे. या अंतर्गत आयएससाठी काम करणाऱ्या तरुणांना दिलेली मोहीम व्यवस्थित पार पाडण्याच्या बदल्यात सेक्स गुलाम दिले जात आहेत. गुलाम म्हणून यजीदी समाजाच्या अनेक मुली आणि तरुणींचा वापर केला जात आहे.
मोहीम फत्ते करणाऱ्यांना दररोज हवा तेवढा वेळ सेक्स गुलाम महिलेसोबत सेक्स करण्याची परवानगी आहे. सेक्स गुलामीच्या नावाखाली उघडपणे सुरू असलेल्या या बलात्कारांमुळे एखादी महिला गरोदर राहू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. लहान मुलांची संख्या वाढली तर त्यांच्या संगोपनाची व्यवस्था करण्यासाठी वेळ, पैसा आणि माणसांची व्यवस्था करावी लागेल. हे करावे लागू नये म्हणून प्रत्येक सेक्स गुलाम महिलेला सेक्स नंतर गर्भननिरोधक गोळीचे सेवन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सेक्स गुलामांची ठराविक दिवसांनी नियमित वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एखादी महिला चुकून गरोदर राहिली तर आधी गर्भपाताचा पर्याय स्वीकारायचा आणि ते शक्य नसल्यास थेट संबंधित गुलाम महिलेची हत्या करायची असा आदेश देण्यात आला आहे.
आयएसच्या तरुण दहशतवाद्यांनी स्वतःच्या सेक्स गुलामांची परस्पर देवाणघेवाण सुरू करुन गुलामगिरीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. जग २१ व्या शतकात डिजिटल क्रांती, जागतिकीकरण या विषयांची चर्चा करत असताना आयएस मध्ययुगीन संस्कृती राबवण्यावर भर देत आहे.
समाजाच्या एकत्रीकरणासाठी मोहम्मद पैगंबराच्या काळात सेक्स दासी ही पद्धत होती. त्यामुळे सेक्स गुलामगिरी राबवण्यात काहीच चूक नाही, असा अमानवी विचार आयएस संघटनेच्या सदस्यांमध्ये पसरवत आहे. आयएसच्या या कार्यपद्धतीमुळे दररोज बलात्काराला बळी पडणाऱ्या महिला फक्त गरोदर राहात नाही, एवढी एकच आनंदाची बाब समजून आलेला प्रत्येक दिवस ढकलत आहे. जोपर्यंत आयएसचा पाडाव होत नाही तोपर्यंत सुटकेची शक्यता नसल्यामुळे सेक्स गुलाम महिलांनी नाईलाजाने गुलामगिरी स्वीकारली आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स